दारू पिण्यास पत्नीने विरोध केला, दिराने हात धरले पतीने पोटावर केले वार; आता भोगावी लागणार इतकी शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 15:57 IST2025-07-02T15:56:53+5:302025-07-02T15:57:28+5:30

दारूच्या नशेत असलेल्या त्यांना पाहून सुरेखा संतापली आणि तिने दारू पिऊन का आलात, असे विचारले. त्यानंतर पतीने आणि दिराने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

Wife opposed drinking alcohol, brother-in-law held her hand, husband hit her on the stomach; now she will have to face this much punishment | दारू पिण्यास पत्नीने विरोध केला, दिराने हात धरले पतीने पोटावर केले वार; आता भोगावी लागणार इतकी शिक्षा

दारू पिण्यास पत्नीने विरोध केला, दिराने हात धरले पतीने पोटावर केले वार; आता भोगावी लागणार इतकी शिक्षा

धुळे : दारू पिण्यास विरोध केल्याने पतीने पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटनेत धुळे सत्र न्यायालयाने आरोपी पतीला पाच वर्षांच्या सश्रम कारावासासह आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दंड न- भरल्यास सहा महिन्याची कारावासाची शिक्षा ठोठवली आहे. सरकारी पक्षाकडून जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर यांनी कामकाज पाहिले.

नेमकं काय घडलं त्या रात्री 

सुरेखा रवींद्र सोनवणे (रा. फागणे, मूळ रा. अजंग, ता. जि. धुळे) ही तिच्या माहेरी फागणे येथे पती रवींद्रसोबत राहत होती. रवींद्रला दारूचे भयंकर व्यसन होते. ७ एप्रिल २०१४ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास रवींद्र आणि त्याचा भाऊ दीपक हे दोघे दारू पिऊन घरी आले. 

दारूच्या नशेत असलेल्या त्यांना पाहून सुरेखा संतापली आणि तिने दारू पिऊन का आलात, असे विचारले. यावरून संतापलेल्या दोघा भावांनी तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, परिस्थिती आणखी बिघडली. 

दीपकने सुरेखाचे दोन्ही हात घट्ट पकडून ठेवले, तर रवींद्रने क्रूरपणे तिच्या पोटात चाकूने वार केला. या हल्ल्यात सुरेखा गंभीर जखमी झाली आणि रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळली. हा भयानक प्रकार घडल्यानंतर दोघेही भाऊ घटनास्थळावरून पळून गेले. 

सुरेखाच्या आई कलाबाई यांनी प्रसंगावधान राखत तातडीने तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी केलेल्या त्वरीत उपचारामुळे सुरेखाचा जीव वाचला. या भीषण हल्ल्याप्रकरणी सुरेखा हिने धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.

...तर सहा महिन्यांचा सश्रम कारावास भोगावा लागेल

सर्व पुरावे, जोरदार युक्तिवाद आणि सर्वोच्च न्यायालयाचे पूर्वीचे निकाल या सर्वांचा सांगोपांग विचार करून सत्र न्यायाधीश ज्ञानेश्वर आहेर यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. न्यायालयाने आरोपी रवींद्रला भारतीय दंड संहिता कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) अन्वये दोषी ठरवत पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी सहा महिन्यांचा सश्रम कारावास भोगावा लागेल.

पत्नीच्या उपचारासाठी करावी लागेल मदत...

यासोबतच, जर सुरेखाला भविष्यात तिच्या जखमेमुळे शस्त्रक्रियेची गरज भासल्यास, जिल्हा शल्य चिकित्सकांनी कोणतीही फी न घेता ती शस्त्रक्रिया करावी, असाही मानवी दृष्टीकोनातून आदेश न्यायालयाने दिला. या खटल्यामध्ये सरकारी पक्षाचे कामकाज जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर यांनी पाहिले. त्यांना अॅड. मयुर बैसाने आणि अॅड. अमरसिंह सिसोदिया यांचे तसेच पैरवी अधिकारी परदेशी यांचे सहकार्य लाभले.

सह आरोपी दीपक सोनवणेचा मृत्यू

या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक बिपीन चौधरी आणि पोलीस उपनिरीक्षक मिलींद बनसोडे यांनी केला. पोलिसांनी सखोल तपास करून आरोपपत्र दाखल केले. खटला सुरू असतानाच सह-आरोपी दीपक रावण सोनवणे याचा मृत्यू झाला. त्यामुळे हा खटला केवळ रवींद्रच्या विरोधात चालवण्यात आला. 

Web Title: Wife opposed drinking alcohol, brother-in-law held her hand, husband hit her on the stomach; now she will have to face this much punishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.