लसीकरणाचा मासिक पाळीवर कोणताही परिणाम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:36 IST2021-05-13T04:36:01+5:302021-05-13T04:36:01+5:30
भूषण चिंचोरे / लोकमत न्यूज नेटवर्क कोरोना लसीकरणाचा मासिक पाळीवर कोणताही परिणाम होत नाही. कोरोनापासून संरक्षण मिळण्यासाठी लस हे ...

लसीकरणाचा मासिक पाळीवर कोणताही परिणाम नाही
भूषण चिंचोरे / लोकमत न्यूज नेटवर्क
कोरोना लसीकरणाचा मासिक पाळीवर कोणताही परिणाम होत नाही. कोरोनापासून संरक्षण मिळण्यासाठी लस हे महत्त्वाचे शस्त्र आहे. मासिक पाळीदरम्यान, मासिक पाळीपूर्वी किंवा पाळीनंतर लस घेतल्याने मासिक पाळीवर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे तरुणी व महिलांनी अफवांना बळी न पडता लसीकरण करावे, असे आवाहन एसीपीएम वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग व प्रसुतितज्ज्ञ मिताली गोलेच्छा यांनी केले आहे.
प्रश्न - गरोदरपणात लसीकरण करता येते का?
उत्तर - केंद्र शासनाच्या निर्देशानुसार गरोदरपणात लसीकरण करता येत नाही. पण इंग्लंड, अमेरिका या देशांमध्ये गरोदर महिलांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणामुळे गर्भाला व्यंग असल्याचे निदर्शनास आलेले नाही. भारतात मात्र गरोदर महिलांना लस घेण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, त्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. संशोधन पूर्ण झाल्यानंतर आपल्या देशातही गरोदर महिलांना लस घेण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी अजून काही महिने वाट बघावी लागेल.
प्रश्न - लस घेतल्यानंतर गरोदरपणाचे निदान झाल्यास काय करावे?
उत्तर - लस घेतल्यानंतर गरोदरपणाचे निदान झाल्यास गरोदरपणाचे उपचार करावेत. गर्भाला काहीही धोका होत नाही. त्यामुळे गर्भपात करण्याची गरज नाही. तसा विचारही मनात आणू नये. पण, त्यानंतर दुसरा डोस म्हणजेच बुस्टर डोस घेऊ नये.
प्रश्न - प्रसुतीनंतर लस घ्यावी का?
उत्तर - प्रसुतीनंतर बाळाला स्तनपान करण्याच्या काळात लस घेऊ नये, अशा सूचना शासनाने केल्या आहेत. तसेच या विषयावर संशोधन सुरू आहे. त्यामुळे याबाबत शासनाच्या नवीन सूचना येईपर्यंत स्तनदा मातांनी लस घेऊ नये.
प्रश्न - मासिक पाळी व लसीकरणाचा एकमेकांवर काही दुष्परिणाम होतो का?
उत्तर - मासिक पाळीत लस घेतल्यानंतर कोणताही दुष्परिणाम होत नाही; तसेच मासिक पाळीवर कोणताही परिणाम होत नाही. समाजमाध्यमांवर याबाबत चुकीचे संदेश फिरत आहेत. अशा चुकीच्या गोष्टी, अफवांना बळी पडू नये. मासिक पाळीमध्ये, पाळीपूर्वी किंवा पाळीनंतर महिला लस घेऊ शकतात. तसेच पीसीओडी, अंडाशयाच्या गाठी, मधुमेह, गर्भपिशवीच्या गाठी, रक्तदाब आदी आजार असतील तरीही त्या लस घेऊ शकतात.
दोन्ही लसी उपयुक्त
कोविशिल्ड तसेच कोवॅक्सिन या दोन्ही प्रकारच्या लसी सारख्याच प्रमाणात उपयुक्त आहेत. पण, पहिला डोस ज्या लसीचा घेतला असेल, त्याच लसीचा दुसरा डोस घेणे गरजेचे आहे.
डॉक्टरांचा सल्ला घ्या
लस घेतल्यानंतर बहुतेक रुग्णांना कोणताही त्रास होत नाही. काही रुग्णांना सौम्य स्वरूपाचा त्रास होतो. ताप येणे, थंडी वाजणे, डोके दुखणे, अंग दुखणे, जुलाब होणे अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. यामुळे घाबरून जाऊ नये. सकारात्मकता ठेवावी. आवश्यकता वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
लसीकरणामुळे मृत्यू नाही
लसीकरणामुळे मृत्यू होत नाही. जागतिक स्तरावर ज्या तुरळक मृत्यूंची नोंद झाली आहे त्या रुग्णांना पूर्वीपासून इतर व्याधी होत्या. त्या इतर व्याधींमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. लसीकरणामुळे मृत्यू होत नाही. ज्येष्ठ नागरिकांसोबतच, मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनीही लस घेणे गरजेचे आहे.