संसार फुलण्याआधीच संपला! धुळ्यात नवविवाहित दाम्पत्याने एकाच झाडाला घेतला गळफास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:11 IST2025-12-30T11:11:08+5:302025-12-30T11:11:08+5:30
सटीपाणी शिवारात नवविवाहित दाम्पत्याची एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

संसार फुलण्याआधीच संपला! धुळ्यात नवविवाहित दाम्पत्याने एकाच झाडाला घेतला गळफास
Dhule Death: धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील सटीपाणी शिवारात एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका २३ वर्षीय तरुण आणि त्याच्या १९ वर्षीय पत्नीने शेतातील एकाच निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही हृदयद्रावक घटना २८ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सटीपाणी येथील रहिवासी मांगिलाल पावरा हे रविवारी सकाळी ६:३० ते ७:०० वाजेच्या सुमारास आपल्या शेतात गेले होते. यावेळी त्यांना शेतातील निंबाच्या झाडाला मुलगा पप्पू मांगिलाल पावरा आणि सून लक्ष्मी पप्पू पावरा यांनी दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. आपल्या डोळ्यांसमोर पोटच्या मुलाचा आणि सुनेचा मृतदेह पाहून वडिलांना मोठा धक्का बसला.
घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नातेवाईकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह झाडावरून खाली उतरवले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, दरवडे आणि कुशारे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
मृतदेह खासगी वाहनाने शिरपूर येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये (कुटीर रुग्णालय) नेण्यात आले. दुपारी २:१५ वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल लांबोळे यांनी दोघांनाही मृत घोषित केले.
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
मृतांच्या शरीरावर कोणत्याही बाह्य जखमा आढळून आलेल्या नाहीत. प्राथमिक तपासात हा मृत्यू गळफास घेतल्यानेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अवघ्या १९ आणि २३ वर्षांच्या या नवविवाहित दाम्पत्याने टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. संसार बहरण्यापूर्वीच या जोडीने आपले आयुष्य संपवल्याने गावात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. ही आत्महत्या कौटुंबिक वादातून झाली, आर्थिक विवंचनेतून की अन्य काही वैयक्तिक कारणातून, याचा शोध पोलीस घेत आहेत.
गाव शोकसागरात
सटीपाणी गावातील या तरुण दाम्पत्याच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. "अजून तर संसाराला सुरुवात झाली होती, असं काय घडलं की त्यांनी हे पाऊल उचललं?" अशी हळहळ ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, मृतांचे मोबाईल आणि नातेवाईकांचे जबाब यावरून सत्य समोर येण्याची शक्यता आहे.