सर्वसाधारण गटांमध्ये चुरशीच्या लढती होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 13:34 IST2019-11-27T13:34:18+5:302019-11-27T13:34:35+5:30
शिरपूर तालुक्यात गेल्यावेळेपेक्षा एका गटाची झाली वाढ, राजकीय पक्षांच्या बैठका सुरू

सर्वसाधारण गटांमध्ये चुरशीच्या लढती होणार
आॅनलाइन लोकमत
शिरपूर (जि.धुळे) : तालुक्यात जिल्हा परिषदेचे १४ गट आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण असल्याने, विखरण बु़ वनावल, शिंगावे व भाटपुरा या चार गटांमधील लढत अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. तालुक्याला अध्यक्षपदाचा बहुमान मिळावा यासाठी आतापासूनच सर्व पक्षांतर्फे मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे.
सन २०१३ च्या निवडणुकीत एका गटाची वाढ झाल्यामुळे १३ गट व २६ गण झाले होते़ मात्र यावेळी झालेल्या गटाच्या फेररचनेत तालुक्यातील गटाची संख्या पुन्हा एकाने वाढली. तालुक्यात आता १४ गट व २८ गणासाठी निवडणूक होत आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले. धुळे जिल्ह्याचे अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण निघालेले आहे. तालुक्यात चार सर्वसाधारण गट आहेत. उर्वरीत १० गट आरक्षित आहेत़ त्यामुळे या चार गटामध्ये निवडणूक चांगलीच रंगणार आहे़
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आमदारद्वयींनी भाजपात प्रवेश केला आहे, त्यामुळे या निवडणूकीत समिकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. त्यातही काँग्रेसच्या जुन्या नेत्यांना संधी दिली जाते की नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाते याकडे तालुकावासियांचे लक्ष लागलेले आहे. नेमकी कुणाची वर्णी लागून प्रमोशन मिळते की भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना संधी देवून वर्चस्व राखले जाते का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे़
दरम्यान, विखरण बु़ वनावल, शिंगावे व भाटपुरा गट सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित असल्यामुळे या गटातून उमेदवारी देतांना पक्षश्रेष्ठींना मोठी कसरत करावी लागणार आहे़ त्यात विखरण बु़ गटात तुषार रंधे, राहुल रंधे, दीपक गुजर, साहेबराव पाटील, क्रांती पवार, वनावल गटात सीमा तुषार रंधे, उज्वला निलेश पाटील, भावना मनोहर पाटील, इंदूबाई जगतसिंग राजपूत, अभिलाषा भरत पाटील, कल्पना नेतेंद्रसिंग राजपूत, शिंगावे गटात देवेंद्र पाटील, चंद्रकात पाटील, भटू माळी, राजकपूर मराठे तर भाटपुरा गटात प्रा़संजय पाटील, चंद्रकांत धोंडू पाटील, डॉ़डी़बी़पाटील, नरेंद्रसिंग सिसोदिया, भुलेश्वर गुजर, सुरेश गुजर हे इच्छूक असून त्या-त्या गटात त्यांची नावे चर्चिली जात आहेत़ मात्र अद्याप केवळ चर्चाच सुरू असून, कोणाचाही नावावर शिक्का मोर्तब झालेले नाही.
अनुसूचित जमातीचे ९ तर अनुसूचित जातीचा १ असे १० गट आरक्षित आहेत़ त्यामुळे या ठिकाणी निवडणूक सरळ लढत रंगेल असे चित्र दिसते़
दरम्यान जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समितीच्या निवडणुकीवरही लक्ष केंद्रीत करण्यात आलेले आहे. या दोन्ही निवडणुकींसाठी बैठका सुरू झालेल्या असून त्यात निवडणुकीची दिशा ठरवली जात आहे. निवडणुकीची तारीख जवळ आल्यानंतर राजकीय हालचाली गतिमान होऊ शकतील.