धुळे : शहरासह जिल्ह्यात दुचाकीचोरीचे गुन्हे वाढतच आहेत. त्या तुलनेत गुन्हे उघडकीला येण्याचा आलेख कमी आहे. त्यामुळे दुचाकी वापरणाऱ्या सर्वसामान्यांच्या मनात धास्ती आहे.
पोलिसांनी देखील वेळोवेळी केलेल्या यशस्वी कारवायांमुळे दुचाकीचोरांवर वचक निर्माण झाल्याने धुळे शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण कमी झाले असले तरी या चोरांनी ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविल्याचे दिसून येते. गेल्या वर्षभराच्या काळात शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यात मोटारसायकली चोरीचे गुन्हे वाढले आहेत. साक्री तालुक्यातही दुचाकी चोरीला गेल्या आहेत. दरम्यान, साक्री पोलिसांनी मंगळवारी केलेल्या कारवाईत १२ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. चाकरमाने गरजेसाठी खासगी कंपनीकडून कर्ज घेऊन दुचाकी घेतात. काहींचे तर हप्ते फिटत नाही तोच गाडी चोरीला जाते. त्यामुळे पोलिसांनी दुचाकीचोरांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
या भागात सर्वाधिक धोका!
बाजारपेठ - धुळे शहरातील बाजारपेठेत दुचाकीचोरीचा सर्वाधिक धोका आहे. या भागातून काही व्यावसायिकांच्या दुचाकी चोरीला गेल्या आहेत.
मार्केट कमिटी - धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात देखील दुचाकीचोरीचा धोका आहे. या परिसरात चोरीच्या घटना घडल्या आहेत.
बस स्थानक - येथे अधिकृत पार्किंगमध्ये गाडी लावली तर धोका नाही. परंतु इतर ठिकाणी गाडी लावल्यास चोरी होण्याची शक्यता आहे.
शिंदखेडा, शिरपूर - शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात दुचाकीचोरीचे प्रमाण सध्या वाढले आहे. दोंडाईचा शहर तसेच शिंदखेडा शहरातूनही दुचाकी चोरीला जात आहेत. अल्पवयीन गुन्हेगारांची टोळी सक्रिय असल्याचे येथील नागरिक सांगतात.
आतापर्यंत केवळ २० गुन्हे उघडकीस
जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत दुचाकीचोरीचे २२३ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी २० गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी लावला आहे. या गुन्ह्यात हस्तगत केलेल्या दुचाकींची संख्या १०० पेक्षा अधिक असू शकते. अनेक दुचाकींचे चेचीस नंबर नष्ट केल्यामुळे त्या बेवारस पडून राहतात.
दुचाकीचोरांवर बक्षीस नाही
शहरासह जिल्ह्यात दुचाकीचोरीचे गुन्हे वर्षानुवर्षे घडत आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये तेच ते संशयित देखील आढळून येतात. काही गुन्ह्यांचा तर तपासच लागत नाही. असे असले तरी आतापर्यंत दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात चोरांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केलेले नाही.
ऑनलाईन पोर्टलवरही तक्रारी होतात दाखल
राज्य शासनाच्या ऑनलाईन तक्रार निवारण पोर्टलवर देखील तक्रारी दाखल होतात. काही वर्षांपूर्वी शिरपुरातील एका दुचाकीचोरीच्या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली होती. त्यावेळी पोलिसांनी दुचाकीसह चोराला शोधून काढले होते.