राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समितीची त्रैमासिक बैठक मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महेश भडांगे, तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. नितीन पाटील, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या नियंत्रणासाठी शासनाने सिगारेट व तंबाखू नियंत्रण कायदा तयार केला आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा, तालुका व गावपातळीवर या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करावी. तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्या शिक्षकांचे समुपदेशन करीत त्यांना तंबाखूमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी प्रशिक्षण द्यावे.
सार्वजनिक ठिकाणी तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकणाऱ्यांविरोधात कारवाई करावी. त्याचा सविस्तर अहवाल पुढील बैठकीत सादर करावा. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस दलाने संयुक्त कारवाई करावी, असे जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले. जिल्हा नोडल अधिकारी डॉ. पाटील यांनी समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.