लग्नाचं वचन देऊन सुरतच्या विवाहितेला धुळ्यात आणले; तरुणाकडून वारंवार अत्याचार, अश्लील व्हिडीओवरुन ब्लॅकमेलिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 15:33 IST2025-10-20T15:33:21+5:302025-10-20T15:33:40+5:30
धुळ्यात सोशल मीडियावरील प्रेमातून विवाहितेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

लग्नाचं वचन देऊन सुरतच्या विवाहितेला धुळ्यात आणले; तरुणाकडून वारंवार अत्याचार, अश्लील व्हिडीओवरुन ब्लॅकमेलिंग
Dhule Crime: धुळ्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमसंबंध जुळवून एका विवाहितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने एवढ्यावरच न थांबता पीडितेचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही दिली. या प्रकरणी धुळ्यातील एका मुख्य तरुणासह त्याला मदत करणाऱ्या अन्य तिघांविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
लग्नाचे आमिष आणि वारंवार अत्याचार
सुरत येथील रहिवासी असलेल्या एका विवाहितेची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून धुळ्यातील एका तरुणाशी झाली. हळूहळू या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. या प्रेमसंबंधाचा गैरफायदा घेत मुख्य आरोपी असलेल्या तरुणाने विवाहितेला लग्नाचे खोटे आमिष दाखवले. पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, ११ जुलै ते १७ ऑगस्ट २०२५ या सुमारे दीड महिन्याच्या कालावधीत तरुणाने वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तिचे शारीरिक शोषण केले.
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
अत्याचार करताना आरोपी तरुणाने विवाहितेचे काही आक्षेपार्ह आणि खासगी व्हिडीओ देखील गुपचूप शूट केले. पीडितेचे शोषण केल्यानंतर त्याने हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही, तर पीडितेने जर या संपूर्ण प्रकरणाची कुठेही वाच्यता केली किंवा पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला, तर तिला ठार मारण्याची धमकीही त्याने दिली. त्यामुळे पीडिता प्रचंड मानसिक तणावाखाली होती.
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
आरोपीच्या धमक्यांना कंटाळून आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अखेर पीडित विवाहितेने हिंमत दाखवत धुळे तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी राहुल सुखराज कोळी याच्यासह त्याला मदत करणारे अन्य दोन आरोपी समाधान अशोक पाटील आणि कान्हा किरण मोरे या तिघांविरुद्ध भादंविच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत असून, आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या या गंभीर फटनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.