शिरपूर पोलिसांनी पकडला ६० लाखांचा गुटखा, सलग दुसऱ्या दिवशी कारवाई, एकाला केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 19:10 IST2024-02-05T19:10:35+5:302024-02-05T19:10:51+5:30
शनिवारी चार वाहनातून १ कोटी ६५ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला होता.

शिरपूर पोलिसांनी पकडला ६० लाखांचा गुटखा, सलग दुसऱ्या दिवशी कारवाई, एकाला केली अटक
सुनील साळुंखे -
शिरपूर (धुळे) : शिरपूर पोलिसांची महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोहीम सुरू असून, सलग दुसऱ्या दिवशी गुटखा वाहतूक करणारा ट्रक पकडून ६० लाख ३७ हजाराचा गुटखा व ३० लाखांचा ट्रक असा एकूण ९० लाख ३७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. शनिवारी चार वाहनातून १ कोटी ६५ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला होता.
रविवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास शिरपूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांना माहिती मिळाली की, आमोदे (ता.शिरपूर) गावाजवळील शिरपूर फाटा येथे पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या ट्रकमध्ये (क्र.एमएच १८-बीए०१३६) महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक छाया पाटील व पथकाने ट्रक पकडला. ट्रकची तपासणी केली असता, त्यात विविध प्रकारचा ६० लाख ३७ हजार ६०० रुपयांचा गुटखा आढळून आला.
याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ट्रक चालक निसार इसाक सय्यद (वय ३४, रा. रामसिंगनगर, शिरपूर) याला अटक केली.