धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 18:28 IST2025-08-07T18:26:07+5:302025-08-07T18:28:30+5:30
Dhule Crime news: मतदान झाल्यानंतर ईव्हीएम महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आले आहेत. येथे सूर्यवंशी ड्युटीवर होते.

धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
धुळे शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ईव्हीएम मशीन ठेवलेल्या आहेत. ईव्हीएम स्ट्रॉगरूम बाहेर ड्युटीवर असलेल्या हेड कॉन्स्टेबल उमेश दिनकर सूर्यवंशी (वय ४८) यांनी बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास स्वतःच्या एसएलआर बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जखमी सूर्यवंशी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गोळीचा आवाज झाल्याने बाजार समितीच्या आवारात असलेले तरुण तिकडे धावून गेले. रक्तबंबाळ अवस्थेतील सूर्यवंशी यांना त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली.
उमेश सूर्यवंशींची प्रकृती चिंताजनक
सूर्यवंशी यांची प्रकृती गंभीर झाली असून, ते बोलण्याच्या स्थितीत नाहीत. त्यामुळे त्यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
सूर्यवंशीची पोलीस दलातील कारकीर्द वादग्रस्त
जखमी उमेश सूर्यवंशी यांची आतापर्यतची पोलीस दलातील कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. त्यांना २०२३ मध्ये लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. तसेच पोलिस विभागातर्फे त्यांच्यावर आतापर्यंत २४ वेळा विविध प्रकारची शिस्तभंगाची कारवाई झाली आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.