'मला गोळी लागलीय'; मुलाला फोन करुन EVM च्या स्ट्राँगरूमधून बाहेर आला पोलीस कर्मचारी, धुळ्यातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 11:16 IST2025-08-07T11:15:46+5:302025-08-07T11:16:16+5:30
धुळ्यात कर्तव्यावरील पोलीस हवालदाराने स्वतःवर बंदुकीची गोळी झाडल्याचा प्रकार समोर आला आहे.

'मला गोळी लागलीय'; मुलाला फोन करुन EVM च्या स्ट्राँगरूमधून बाहेर आला पोलीस कर्मचारी, धुळ्यातील प्रकार
Dhule Crime: धुळे शहरातील वखार महामंडळाच्या गोदामातील ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ४८ वर्षीय उमेश दिनकर सूर्यवंशी यांनी कर्तव्यावर असतानाच बुधवारी सकाळी साडेअकराच्या स्वतःवर गोळी झाडली. जखमी सूर्यवंशी यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. एसएलआर बंदुकीची गोळी हवालदार उमेश सूर्यवंशी यांच्या डाव्या छातीला चाटून गेल्यानंतर ते रक्तबंबाळ झाले होते.
गोळी लागल्यानंतर उमेश यांनी तशाच अवस्थेत त्यांनी मुलाला फोन करून 'मला गोळी लागली आहे' असं सांगितले. त्यानंतर ते तशाच जखमी अवस्थेत चौकीबाहेर आले. त्यांच्या मुलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आझाद नगर पोलिसांनाही याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनीही धाव घेतली. चौकीतच सूर्यवंशी यांनी स्वतःवर झाडलेली गोळी छातीला चाटून खिडकीतून बाहेर गेल्याचा अंदाज आहे. त्यांची वर्दी खोलीत टांगलेली होती. तर खाली अंथरलेली गादी रक्ताने माखलेली होती. रायफल एलईडी स्क्रीनजवळ ठेवली होती.
धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम क्रमांक तीन मधील स्ट्रॉग रुममध्ये ईव्हीएम मशिन ठेवली आहेत. याठिकाणी पोलिसांचा खडा पहारा आहे. याचठिकाणी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास गोळीचा मोठा आवाज झाला. तेव्हा परिसरात उपस्थित तरुणांनी गोदामाकडे धाव घेतली. तो पर्यंत हवालदार उमेश सूर्यवंशी हे रक्तबंबाळ अवस्थेत बाहेर येताना दिसले. उमेश यांचा फोन आल्याने मुलगा देखील घटनास्थळी दाखल झाला. त्याने आझादनगर पोलिसांना कॉल केल्याने ते ही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सूर्यवंशी यांना तातडीने आधी शासकीय रुग्णालयात नंतर प्रकृती गंभीर असल्याने खासगी रुग्णालयात दाखल केले.
हेड कॉन्स्टेबल उमेश सूर्यवंशी यांची पोलिस दलातील कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. २२ जून १९९६ रोजी राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ६, धुळे येथे त्यांची भरती झाली होती. त्यांच्यावर आतापर्यंत एकूण २४ वेळा विविध प्रकारची शिस्तभंगाची कारवाई झाली. ४ मे २०२३ रोजी शहर वाहतूक शाखेत लाच घेताना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यानंतर लगेचच तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी त्यांना सेवेतून निलंबित केले होते. तसेच त्याआधी ७ जून २००८ रोजी राज्य राखीव पोलिस बल, गट क्र. ६ मध्ये डयुटीवर मद्य सेवन केल्याने निलंबित करण्यात आले होते.
घटनेनंतर संध्याकाळपर्यंत जखमी हवालदार सूर्यवंशी यांची प्रकृती स्थिर होती. ते बोलण्याच्या अवस्थेत नसल्याने यासंदर्भात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मात्र रात्री उशीरा जखमी उमेश सूर्यवंशी यांची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे याबाबत गुन्हा दाखल झालेला नव्हता.