धुळ्यात बसवर दगडफेक, नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 18:09 IST2018-05-28T18:09:40+5:302018-05-28T18:09:40+5:30
पारोळा रोडवरील घटना : तिघांविरुध्द गुन्हा

धुळ्यात बसवर दगडफेक, नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महामंडळाच्या बसवर दगडफेक झाल्याने प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले़ ही घटना पारोळा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीनजिक रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली़ या प्रकरणी सोमवारी पहाटे अडीच वाजता तिन अज्ञात विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला़
यावल येथून निघालेली एमएच ४० एन ९०२४ क्रमांकाची राज्य परिवहन महामंडळाची बस धुळ्यात दाखल झाली़ पारोळा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नजिक असलेल्या राम पॅलेस समोर ही बस आल्यानंतर तीन जणांनी ही बस अडविली़ दमदाटी करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला़ अचानक झालेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते़ हे तिघे एवढ्यावरच न थांबता त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली़ ही घटना रविवारी रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या सुमारास घडली़ या दगडफेकीत बसच्या पुढच्या भागाचे काच फुटल्याने महामंडळाचे १० हजाराचे नुकसान झाले आहे़ या घटनेनंतर अंधाराचा फायदा घेत दगडफेक करणारे तिघे घटनास्थळावरुन पळून गेले़
घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ परिसरात शोध घेतला असता दगडफेक करणारे तिघे सापडले नाही़ याप्रकरणी बस चालक मच्छिंद्र पुंजू पाटील यांनी आझादनगर पोलीस स्टेशनला सोमवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली़ त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उगले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे़