वीज पडून एकाचा मृत्यू, महिला जखमी, धुळे तालुक्यातील जुनवणे येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 22:49 IST2023-04-08T22:48:26+5:302023-04-08T22:49:07+5:30
धुळे तालुक्यातील जुनवणे शिवारात ज्ञानेश्वर पाटील हे आपल्या परिवारासोबत राहत होते. जुनवणे शिवारात त्यांची शेती आहे. शेतात गहू पिकाची काढणी सुरू हाेती. त्याठिकाणी गावातील काही जण त्यांच्या सोबत शेतात होते.

वीज पडून एकाचा मृत्यू, महिला जखमी, धुळे तालुक्यातील जुनवणे येथील घटना
धुळे : अचानक ढगाळ वातावरण तयार झाले आणि विजांचा कडकडाट झाला. अशातच अंगावर वीज कोसळली आणि दोन जणांना गंभीर दुखापत झाली. ही घटना धुळे तालुक्यातील जुनवणे शिवारात सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. यात ज्ञानेश्वर नागराज पाटील (४८) यांचा मृत्यू झाला. तर केवळबाई देवराम मोरे (पाटील) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धुळे तालुक्यातील जुनवणे शिवारात ज्ञानेश्वर पाटील हे आपल्या परिवारासोबत राहत होते. जुनवणे शिवारात त्यांची शेती आहे. शेतात गहू पिकाची काढणी सुरू हाेती. त्याठिकाणी गावातील काही जण त्यांच्या सोबत शेतात होते. सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास अचानक वारा सुरू झाला. पावसाचे वातावरण तयार झाले. विजांचा कडकडाट सुरू झाला. सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट होऊन वीज कोसळली. ही वीज ज्ञानेश्वर पाटील आणि केवळबाई देवराम मोरे (पाटील) यांच्या अंगावर कोसळली. त्यांना तातडीने जखमी अवस्थेत हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी ज्ञानेश्वर पाटील यांना मृत घोषित केले. तर केवळबाईवर उपचार सुरू आहेत. शिक्षक दामोदर नवल पाटील (वय ४३, रा. जुनवणे ता. धुळे) यांनी दिलेल्या माहितीवरून धुळे तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.