पुनर्वसित होत असलेल्या दिवी गावाच्या गावठाणमध्ये विविध नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचा बारा कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च करण्यात आला आहे; परंतु पुनर्वसन गावठाणमधील भूखंड वाटपातील अनियमितता, कच्चे रस्ते,पाणी पुरवठा योजना, यांसारख्या विविध नागरी सुविधांची झालेली निकृष्ट दर्जाची कामे यामुळे आजही दिवी गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न कायमच आहे. भूखंड वाटप व नागरी सुविधांवर झालेल्या खर्चाची चौकशी करण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राजपूत यांनी केली आहे.
शिंदखेडा तालुका हा अवर्षणग्रस्त तालुका आहे. या तालुक्यातील गावांची पाणी टंचाई दूर व्हावी व शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे. यासाठी बुराई नदीवर वाडी शेवाडी मध्यम सिंचन प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पांतर्गत वाडी व दिवी ही गावे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येतात. यापैकी वाडी गावाचे पुनर्वसन झाले असून, दिवी गावाचा पुनर्वसनासाठी गावापासून पाच-सहा किमीवर असलेला शासकीय भूखंड आरक्षित करण्यात आला. सुमारे तीनशेच्यावर कुटुंबांचे पुनर्वसन या भूखंडात करण्यात येत आहे. या पुनर्वसित क्षेत्रातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
पुनर्वसन गावठाणातील भूखंड चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने वाटप करण्यात आले आहेत. यातील काही लाभार्थ्यांना अधिक क्षेत्रफळाचा भूखंड तर काहींना कमी क्षेत्रफळाचा भूखंड देण्यात आला आहे.
नागरी सुविधांवर बारा कोटी रुपये खर्च; मात्र सुविधांचा अभाव---
दिवी गावाच्या पुनर्वसन क्षेत्रात अठरा विविध नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बारा कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च केला; मात्र या नागरी सुविधांचा प्रकल्पबाधितांना उपयोग होत नसल्याने या सुविधांवर खर्च झालेला शासनाचा पैसा वाया गेल्यासारखी स्थिती आहे. पाणी पुरवठा योजनेसाठी सव्वादोन कोटी निधी मंजूर झाला, त्यापैकी दोन कोटी १३ लाख ६४ हजार रुपये ठेकेदाराला दिले आहेत. प्रत्यक्षात मात्र या पाणीपुरवठा योजनेचा लाभ प्रकल्पग्रस्तांना मिळत नाही. पाणी पुरवठ्याची विहीर काटेरी झुडपात असून, विहिरीपासून ३०० मीटर लांब पंप गृह बांधला असून, या विहिरीपर्यंत जाण्यासाठी रस्तादेखील नाही. पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.
देवी पुनर्वसन क्षेत्रात शाळा, समाज मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, बस थांबा, गुरांसाठी पाणी पिण्याचा हौद, बाजारओटे, सार्वजनिक शौचालय, मुतारी, यासाठी ३९ लाख १३ हजार रुपयांचा निधी खर्च केला आहे. अनेक कामे निकृष्ट दर्जाची असून, यातील अनेक सुविधांपासून लाभार्थी वंचित आहेत. येथे यू आकाराच्या गटारी, अंतर्गत रस्त्याची कामे केली. यासाठी पाच कोटी ८८ लाख ७७ हजार रुपये निधी खर्च झाला. असे असतानाही परिसरात रस्त्यांचा अभाव आहे.
स्मशानभूमीची दुरवस्था::--पुनर्वसित क्षेत्रात एक ते दीड कि.मी.वर बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीची तर पार दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही, अंत्यसंस्कारासाठी ओटे नाही. अंत्ययात्रेत आलेल्या नागरिकांना थांबण्यासाठी निवारा नाही, अश्या अनेक समस्यांनी वेढलेल्या या स्मशानभूमीनेच प्राण सोडला आहे.