वरखेडी भागातील महापालिेकेची जागा विकण्याचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:36 IST2021-02-10T04:36:36+5:302021-02-10T04:36:36+5:30
धुळे महानगरात मनपा मालकीचे अनेक भूखंड आहेत. त्यातील एक वरखेडी भागातील ९ एकर १२ गुंठे जागा ही महापालिका मालकीची ...

वरखेडी भागातील महापालिेकेची जागा विकण्याचा डाव
धुळे महानगरात मनपा मालकीचे अनेक भूखंड आहेत. त्यातील एक वरखेडी भागातील ९ एकर १२ गुंठे जागा ही महापालिका मालकीची मालमत्ता आहे. सदरील जागा सुमारे १० कोटी रुपयांची आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने काही व्यक्तींकडून ही जागा हडप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे ही जागा परस्पर नावावर करून घेण्याचे काम संबंधित करीत आहेत. सदरील जागा ताब्यात घेण्याचा आदेश सभापती सुनील बैसाणे यांनी आढावा बैठकीत दिला.
मंगळवारी महापालिकेत दुपारी १२ वाजता महानगरपालिका कामकाजासंदर्भात सर्व सदस्य, तसेच मनपा अधिकाऱ्यांची एकत्रित आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली होती.
या बैठकीला स्थायी समिती समिती सभापती सुनील बैसाणे, स्थायी समिती सदस्य भारती माळी, कमलेश देवरे, नगरसेवक दगडू बागूल, अन्सारी वसीम बारी खलील रहेमान, सामाजिक कार्यकर्ते गुलशन उदासी, राकेश कुलेवार, भागवत देवरे, मनपा उपायुक्त शांताराम गोसावी, सहा. आयुक्त विनायक कोते, नगररचनाकार महेंद्र परदेशी, मुख्य लेखाधिकारी दिनकर जाधव, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे, नगरसचिव मनोज बाघ, सहा. आरोग्याधिकारी चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील, ओव्हरसिअर पी.डी. चव्हाण, सी.सी. बागूल, हेमंत पावटे, प्र. लेखापाल पी.डी. नाईक, आस्थापना कार्यालयीन अधीक्षक रमजान अन्सारी, विद्युत अभियंता एन.के. बागूल, मालमत्ता कर अधीक्षक बी.एस. रनाळकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना सभापती बैसाणे म्हणाले की, महानगरपालिकेत आपण एकनिष्ठेने काम करीत आहोत, ही चांगली बाब आहे. धुळेकरांना आपल्याविषयी माेठ्या अपेक्षा आहेत. त्यासाठी प्रशासनाकडूनही त्यांना योग्य ते सहकार्य अपेक्षित आहे. आगामी काळात नागरिक व सदस्यांच्या तक्रारीचे तात्काळ निराकरण होईल, अशी अपेक्षा आहे. कोणाकडून मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा विनाकारण अपमान केला जात असेल, तर मी तुमच्या सोबत आहे. तुमच्याकडून मला चांगल्या कामाची अपेक्षा आहे.
‘सभापती आपल्या दारी’ ही मोहीम माझ्या सभापतीपदाच्या अंतिम काळात पार पडली. या मोहिमेसाठी सर्वांनी चांगले सहकार्य केले. भविष्यात ‘माझी वसुंधरा’ योजनेंतर्गत पांझरा नदी स्वच्छता मोहीम सर्व सामाजिक संघटना, विविध शासकीय, अशासकीय अधिकारी, कर्मचारी, तसेच मनपाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ७ दिवस राबविण्याचा मानस आहे. यासाठीदेखील मनपा प्रशासनाचे सहकार्य राहील, अशी अपेक्षा आहे.