अज्ञात वाहनाच्या धडकेत पती ठार,पत्नी गंभीर; शिरपूर तालुक्यातील दहिवद गावाजवळील घटना
By अतुल जोशी | Updated: April 16, 2023 16:48 IST2023-04-16T16:47:57+5:302023-04-16T16:48:29+5:30
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील दहिवद शिवारातील वाहतूक पोलिस चौकीजवळ अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिली.

अज्ञात वाहनाच्या धडकेत पती ठार,पत्नी गंभीर; शिरपूर तालुक्यातील दहिवद गावाजवळील घटना
धुळे : शिरपूर तालुक्यातील दहिवद शिवारात वाहतूक पोलिस चौकीजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसली. यात पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. शिरपूर तालुका पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली. शिरपूर तालुक्यातील मांडळ शिवारात राहणारे अमरसिंग नानला पावरा (वय ५५) आणि त्यांची पत्नी वेस्तीबाई अमरसिंग पावरा (वय ४५) हे दोघे मध्यप्रदेशातील सेंधवा येथे कामासाठी गेले होते. ते दोघे शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एमएच १८ एबी ११२३ क्रमांकाच्या दुचाकीने गावी परत येत होते.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील दहिवद शिवारातील वाहतूक पोलिस चौकीजवळ अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात अमरसिंग पावरा आणि वेस्तीबाई पावरा या दोघांना दुखापत झाली. तातडीने दोघांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. शशिकांत पाटील यांनी तपासून अमरसिंग पावरा यांना मयत घोषित केले. तर त्यांची पत्नी वेस्तीबाई हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रुग्णालयाचा वार्ड बॉय नितेश गवळी यांनी दिलेल्या माहितीवरून शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हेड कॉन्स्टेबल संजय माळी घटनेचा तपास करीत आहेत.