बळसाणे व परिसरातील शेतकऱ्यांनी बाजरी, मका, सोयाबीन, उडीद,कापूस, तीळ, भुईमूग या पिकांची लागवड केली. गेल्या आठवड्यापासून रिपरिप पाऊस तर कधी ढगाळ वातावरण असल्याने, कपाशी पिकांची पाने लालसर, पिवळसर झाली आहेत. सखल भागातील तुरीचे पीक देखील पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. काही ठिकाणी पिकातून पाणी वाहत असल्याने त्या पिकांच्या मुळांना देखील विषाणूजन्य आजार जडले आहेत. बदलत्या वातावरणामुळे उडीद, मूग या पिकांवर भुरी, मावा रोग तर मक्यांवर लष्करी अळी व इतर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. रोगराईमुळे पीक उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कापूस, तूर, मूग या पिकांना पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. तोडणीला आलेला मूग भिजल्यामुळे शेंगा फुगल्या तर कपाशी व कांद्याला जास्त पाणी झाल्यामुळे विषाणूजन्य आजाराने उद्ध्वस्त केले आहे. हलक्या जमिनीवरील पिकांवर किडीचा व रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे बळसाणे व परिसराचा शेतकरी मेटाकुटीला आला आहे
खरीप हंगामातील कांद्याची लागवड जवळपास पूर्ण झाली असून उशिराची लागवड सुरू आहे .पावसामुळे कांदा पिकावरही विविध रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे कांद्याचे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
बळसाणेसह माळमाथा परिसरात कांदा हे प्रमुख पीक घेतले जाते. या भागात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे परंतु सततच्या पावसामुळे व बदलत्या हवामानामुळे कांदा पिकांवर मर रोगाची समस्या आहे.