कुणाल पाटील यांच्या मंत्रिपदासाठी हालचाली; प्रदेशाध्यक्षांची अनुकूलता असल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 04:21 PM2019-12-04T16:21:41+5:302019-12-04T16:23:34+5:30

आमदार कुणाल पाटील समर्थक व पदाधिकारी आनंदोत्सवाच्या तयारीला लागले असल्याचे पाहायला मिळत आहे.

Discussion about Kunal Patil getting minister | कुणाल पाटील यांच्या मंत्रिपदासाठी हालचाली; प्रदेशाध्यक्षांची अनुकूलता असल्याची चर्चा

कुणाल पाटील यांच्या मंत्रिपदासाठी हालचाली; प्रदेशाध्यक्षांची अनुकूलता असल्याची चर्चा

googlenewsNext

धुळे : राज्य मंत्रीमंडळात काँग्रेसतर्फे जिल्ह्यातून निवडून आलेले एकमेव आमदार कुणाल पाटील यांना स्थान देण्यासंदर्भातील चर्चा पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत मंत्रिमंडळातील काँग्रेसच्या मंत्र्यांची नावे निश्चित करण्यासंदर्भात राजकीय हालचालींना वेग आला आहे.कुणाल पाटील हे दिल्लीत दाखल झाले आहेत. तर पक्षाचे जेष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्याविषयी पक्षात आदर आहे, त्याचा लाभ पाटील यांना होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले पक्षाचे एकमेव आमदार कुणाल पाटील यांना मंत्रीपद देण्यात यावे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष शाम सनेर व धुळे मनपाचे विरोधी पक्ष नेते साबीर शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात मुंबईत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली होती.त्यानंतर या शिष्टमंडळाच्या त्यावेळी प्रदेशाध्यक्षांसह पक्षाच्या अन्य नेत्यांनी अनुकूलता दाखविली होती.

त्यानंतर जिल्हा अध्यक्ष शाम सनेर यांनी शिष्टमंडळासोबत पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पक्षाचे निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे, केंद्रातील नेते अहमद पटेल यांचीही भेट घेतली. या सर्व नेत्यांनी कुणाल पाटील यांना मंत्रीपद देण्यास अनुकूलता दर्शवली होती.तसेच दिल्लीत यासंदर्भात पक्षश्रेष्ठीकडे आपले विचार पोहोचवू असे आश्वासन देखील दिले असल्याचे बोलले जात आहे.

दिल्लीत असल्याने बुधवारी शिंदखेडा आणि साक्री येथे जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत आयोजित मेळाव्यास आमदार कुणाल पाटील अनुपस्थित राहणार असल्याचे समजते. त्यामुळेच आता मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रोहिदास पाटील हे उपस्थित राहणार असल्याचे साक्री शिंदखेडा तालुका काँग्रेसच्या पत्रकात म्हटले आहे.

तर काँग्रेस पदाधिकारी हे आमदार कुणाल पाटील यांना मंत्रीमंडळात स्थान मिळणारच असे खाजगीत ठामपणे सांगत आहे. परंतु पक्षश्रेष्ठी निर्णय जाहीर करणार असल्याने त्याआधी बोलणे योग्य नाही, असेही सांगत आहे. आमदार कुणाल पाटील समर्थक व पदाधिकारी आनंदोत्सवाच्या तयारीला लागले असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

 

Web Title: Discussion about Kunal Patil getting minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.