धुळे जिल्ह्याच्या पाणी टंचाई कृती आराखड्यास विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 18:55 IST2019-11-26T18:54:53+5:302019-11-26T18:55:10+5:30
शेवटच्या टप्प्यात मोजक्या गावांना टंचाईची झळ बसू शकते

धुळे जिल्ह्याच्या पाणी टंचाई कृती आराखड्यास विलंब
आॅनलाइन लोकमत
धुळे : यावर्षी प्रचंड पाऊस झालेला आहे. त्यामुळे दरवर्षाप्रमाणे पाणी टंचाई भासण्याची शक्यता कमीच आहे. मात्र असले असले तरी जिल्हा परिषदेला पाणी टंचाई आराखडा तयार करावा लागत असतो. मात्र पाणी टंचाईचा पहिला टप्पा सुरू झाला तरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने अद्याप टंचाई कृती आराखडा तयार केला नाही.
धुळे जिल्ह्यातील काही भाग अवर्षणप्रवण क्षेत्रात असल्याने, या जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई भासत असते. टंचाई निवारणार्थ दरवर्षी टंचाईच्या काळात जनतेची पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी टॅँकरसह विविध उपाययोजना केल्या जातात. त्यासाठी संपूर्ण जिल्ह्याचा एकत्रित टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. तहानलेल्या गावांची संख्या, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना आदींबाबत तालुकास्तरावरून माहिती संकलित केली जाते. त्याआधारावरच एकत्रितत आराखडा तयार होत असतो.
विशेष म्हणजे या आराखड्यातील उपाययोजना तीन टप्यात राबविल्या जातात. टंचाईचा पहिला टप्पा आॅक्टोबर ते डिसेंबर दरम्यान राबविला जातो. दुसरा टप्पा जानेवारी ते मार्च व तिसरा टप्पा एप्रिल ते जून या कालावधीत राबविला जात असतो. यावर्षी टंचाईचा पहिला टप्पा संपून जवळपास दोन महिने संपत आले तरी अद्याप एकत्रित टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आली नसल्याची माहिती समोर आलेली आहे. अधिकाऱ्यांनी टंचाईची बाब फारशी गंभीरपणे घेतलेली नसल्याचे यावरून दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग पाणी टंचाईचा संभाव्य कृती आराखड्यात महूर्त स्वरूप केव्हा देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान जिल्ह्यात मुबलक पाणी असले तरी अगदी शेवटच्या टप्यात पाच-सहा गावांना पाणी टंचाईची झळ बसू शकते असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे.