कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; धुळे तालुक्यातील नेर शिवारातील घटना
By देवेंद्र पाठक | Updated: May 19, 2023 18:12 IST2023-05-19T18:12:14+5:302023-05-19T18:12:37+5:30
भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; धुळे तालुक्यातील नेर शिवारातील घटना
धुळे : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना नेर शिवारात गुरुवारी घडली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली. सुनील भिमसिंग देसाई (वय २४, रा. टेंभे ता. साक्री) असे मृत तरुणाचे नाव आहे. धुळे तालुक्यातील नेर गावाजवळील पांझरा नदीच्या अलिकडे नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघातप्रकरणी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.
यासंदर्भात रवींद्र देड्या देसाई यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सुनील देसाई हा त्याच्या मोटारसायकल क्रमांक जीजे ०५ एफव्ही ६९२६ मोटारसायकलवरून प्रवास करीत असताना अक्कलपाडा धरणाकडून नेर गावाकडे जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या कारची त्याच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. यात सुनील देसाई हा गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्या डोक्याला आणि शरीराच्या अन्य अवयवाला मार लागला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. अपघाताच्या घटनेनंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. फरार कारचालकाचा शोध सुरु आहे.