कोरोनाचा फायदा घेत काही आध्यात्मिक संस्थांनी देखील संस्कारांचे वर्ग ऑनलाईन सुरु केले आहेत. मुलांवर संस्कार रुजविताना धर्मगुरुंचीही मदत मिळत आहे.
दरम्यान, शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरू आहे. पूर्णवेळ ऑनलाईन वर्ग नसल्याने फावल्या वेळेत मुलांना कार्टून्स बघण्याची संधी मिळत आहे. तसेच खेळण्याचा आनंदही मुले लुटत आहेत. यासोबतच अभ्यासाला देखील प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे, अशा प्रतिक्रिया आहेत.
प्रत्येक धर्मात संस्काराचे धडे
मुस्लीम
मुस्लीम धर्मातही बालवयापासूनच धर्माचे संस्कार शिकविले जातात आणि त्यांचे आचरण करण्याची शिकवण दिली जाते. नमाजपठण करण्याची पध्दत शिकणे, दिवसातून दोन वेळा तस्बीह पठण करणे, कुराणाचे पठण करणे, तसेच विविध दुवा शिकणे आणि त्यांचे नियमित पठण करणे आदी संस्कार आहेत.
हिंदू
या धर्मात शुभंकरोतीसह वेदांच्या अभ्यासाला प्राधान्य दिले जाते. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने उर्वरित वेळेत रामायण, महाभारतासारख्या कथा सांगून संस्कार दिले जातात. संस्कारांचे धडे देणारी लहान लहान पुस्तके वाचायला दिली जातात. बालवयातच संस्कार शिकविले जातात.
ख्रिश्चन
कोरोनामुळे सध्या शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरु आहे. उरलेल्या वेळेत मुलांना बायबलचा अभ्यास करुन धर्माची शिकवण दिली जात आहे. ऑनलाईन प्रशिक्षणवर्ग घेऊन बायबलचे शिक्षण दिले जात आहे. ख्रिश्चन धर्मातील विविध संतांचा जीवनपरिचय करुन दिला जात आहे. त्यातून संस्कार रुजविले जात आहेत.
माैलाना म्हणतात...
बालवयापासूनच मुलांना धर्माच्या आचरणाचे संस्कार दिले जातात. नमाजपठण करण्यासह तस्बीह पठण करण्याचीही शिकवण दिली जाते. दुवा करणे शिकविले जाते. कोरोनामुळे मुलांना जास्तीचा वेळ मिळाला असला तरी अभ्यासाकडेही लक्ष द्यावे.
- मुफ्ती मसुद , माैलाना
पुजारी म्हणतात...
सध्या शाळा बंद असल्याने पालकांनी मुलांना धार्मिक संस्कारांचा अभ्यास देणे गरजेचे आहे. त्यासोबत जीवन जगण्याची कला आत्मसात करणे सोपे जाते. मुलांना अध्यात्माची गोडी लागणे आवश्यक आहे. बालवयापासून दिलेले संस्कार आयुष्यभर टिकतात.
- वसंता कुलकर्णी, पुजारी
फादर म्हणतात...
काेरोनामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. चर्चच्या माध्यमातून ऑनलाईन वर्ग घेऊन बायबल शिकविले जात आहे. विविध संतांची माहिती दिली जात आहे. चांगले आचरण करण्याची शिकवण मुलांमध्ये रुजविली जात आहे.
- वल्सन राॅड्रीग्ज, फादर