नेर येथील एचडीएफसीचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न; एटीएममध्ये ५० लाखांची होती रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2023 15:44 IST2023-04-07T15:42:52+5:302023-04-07T15:44:10+5:30
पोलिस घेतात चोरट्याचा शोध

नेर येथील एचडीएफसीचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न; एटीएममध्ये ५० लाखांची होती रक्कम
राजेंद्र शर्मा, नेर - येथील महामार्गालगत असलेले एचडीएफसी बँकेचे एटीएमच चोरट्याने गुरुवारी रात्री फोडण्याचा प्रयत्न केला. यामुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.तसेच सुरक्षेसंदर्भात बँक अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
नेर येथील महामार्गालगत एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन आहे. या मशीनच्या सुरक्षेसाठी बँकेने सुरुवातीला ३ सुरक्षा रक्षक नेमले होते. त्यामुळे तीन शिफ्टमध्ये एटीएमची सुरक्षा होत होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षा रक्षकांमध्ये एकाची कपात करून दोनच सुरक्षा रक्षकांवर जबाबदारी सोपली आहे. त्यामुळे हे सुरक्षा रक्षक सकाळी ७ वाजेपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत असतात. त्यानंतर एटीएम मशीनचे शटर बंद केले जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजताच सुरक्षा रक्षक येतात. त्यामुळे सुरक्षा रक्षक नेहमीप्रमाणे रात्री ११ वाजेनंतर शटर बंद करून गेल्यावर सकाळी ७ वाजता सुरक्षा रक्षकाला शटर उचकवलेले दिसले. त्यानंतर चोरीचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले.
एटीएममध्ये ५० लाखांची होती रोकड
बँकेने गुरुवारीच दुपारी या एटीएममध्ये ५० लाखांची रोकड टाकली होती. त्यानंतर रात्री एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. चोरटा ते फोडण्यात यशस्वी झाला असता तर बँकचे मोठे नुकसान झाले असते.
चोरटा सीसीटीव्हीत कैद
एटीएम फोडणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तो दुचाकीवर आल्याचे दिसून येत आहे. मात्र दुचाकीला पुढे दोन लाईट असल्याने तिचा नंबरही दिसत नाही. त्यामुळे तपासात अडथळे येण्याची शक्यता आहे.
पोलिसांचा ताफा घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक दाखल झाले. त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना एटीएमच्या सुरक्षेसंदर्भात चांगलेच धारेवर धरले. तसेच सीसीटीव्ही कॅमेरावाल्याला बोलावून फुटेज देण्याचे सांगितले. या वेळी पोलिस अधिकारी उपस्थित होते.
सुट्यामुळे ग्राहकांची गैरसोय
आज गुड फ्रायडे, उद्या दुसरा शनिवार आणि लगेच रविवार अशा बँकेला सलग सुट्या आहेत. त्यात गावात हे एकच एटीएम असल्याने तेही रविवारनंतरच सुरू होणार आहे. त्यामुळे नागरिकांचीही पैशांसासाठी मोठी गैरसोय होणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"