रूम पाहायला जाताच चोरांनी कपडे, रोकड, कारही पळवली; मालेगाव रोडवरील घटना, ४ लाखांवर होता ऐवज
By देवेंद्र पाठक | Updated: December 10, 2023 19:04 IST2023-12-10T19:03:46+5:302023-12-10T19:04:29+5:30
या हॉटेलमध्ये साक्रीतील नागरे नगर येथील रहिवासी रितेश सुरेशसिंह परदेशी (वय ४१) हे आलेले होते. त्यांनी हॉटेलच्या पार्किंगमध्ये ४ लाख रुपये किमतीची एमएच १८ डज्ल्यू ५४३४ क्रमांकाची कार लावलेली होती.

रूम पाहायला जाताच चोरांनी कपडे, रोकड, कारही पळवली; मालेगाव रोडवरील घटना, ४ लाखांवर होता ऐवज
धुळे : मालेगाव रोडवरील एका हॉटेलच्या पार्किंगमधून चोरट्याने कार आणि त्यामध्ये ठेवलेले ६ हजार रुपये रोख आणि कपड्यांच्या बॅगा असा ४ लाख ६ हजारांचा ऐवज शिताफीने लांबविला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शनिवारी सायंकाळी चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शहरानजीक झंकार पॅलेस हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये साक्रीतील नागरे नगर येथील रहिवासी रितेश सुरेशसिंह परदेशी (वय ४१) हे आलेले होते. त्यांनी हॉटेलच्या पार्किंगमध्ये ४ लाख रुपये किमतीची एमएच १८ डज्ल्यू ५४३४ क्रमांकाची कार लावलेली होती.
या कारमध्ये ६ हजार रुपये रोख रक्कम, कपड्यांच्या बॅगा ठेवलेल्या होत्या. रुम पाहिल्यानंतर थोड्या वेळाने ते कारजवळ सामान घेण्यासाठी आले असता त्यांना कार दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेण्यात आला. तरीही त्याचा काही उपयोग झाला नाही. चोरीची ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसात ते रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. कार चोरीला गेली आहे असे स्पष्ट झाल्यानंतर रितेश परदेशी यांनी शहर पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद दाखल केली. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस हेड कॉन्स्टेबल एस.डी. मोरे घटनेचा तपास करीत आहेत.