भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्ध महिला ठार; साक्रीनजीक महामार्गावरील घटना
By देवेंद्र पाठक | Updated: March 14, 2023 18:51 IST2023-03-14T18:50:23+5:302023-03-14T18:51:30+5:30
धुळे जिल्ह्यातील साक्रीजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.

भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्ध महिला ठार; साक्रीनजीक महामार्गावरील घटना
धुळे : साक्रीजवळून जाणाऱ्या नवीन बायपास रोडवर केमिकल फॅक्टरीसमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाची रस्ता ओलांडत असणाऱ्या वृद्ध महिलेला धडक बसली. यात ती गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. फरार वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला. साक्री तालुक्यातील पंढरपूर येथील मीताबाई सत्तू मारनर (वय ६५) या वृद्ध महिला सोमवारी सकाळी नवीन बायपास रोडवरील केमिकल फॅक्टरी समोरून रस्ता ओलांडत हाेत्या.
त्याचवेळेस सुरतकडून,धुळ्याकडे येणाऱ्या अज्ञात वाहनाची त्यांना जोरदार धडक बसली. या अपघातात वृद्ध महिला दूरवर फेकली गेल्याने त्यांच्या डोक्याला आणि शरीराच्या अन्य ठिकाणी गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मार अधिक लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी जंगलू महारू मारनर यांनी साक्री पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, अज्ञात फरार वाहन चालकाविरोधात साक्री पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास डी. आर. कांबळे घटनेचा तपास करीत आहेत.