धुळे - अनलॉकनंतर सर्वकाही सुरळीत सुरू झाले आहे. इतर जिल्ह्यातून धावणाऱ्या रेल्वेगाड्या सुरू झाल्या आहेत. मात्र धुळे- चाळीसगाव रेल्वेगाडीची प्रवाशांना अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे. धुळे ते चाळीसगाव दरम्यान पॅसेंजर रेल्वेच्या चार फेऱ्या व्हायच्या. कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव झाल्यानंतर तसेच लॉकडाउन झाल्यामुळे संपूर्ण देशातील रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. अनलॉकनंतर आता हळूहळू देशभरातील रेल्वेसेवा टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहे. सुरुवातीला पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानंतर विशेष गाड्या व एक्प्रेस रुळांवरून धावणार आहेत. धुळे-चाळीसगाव पॅसेंजर गाडी मात्र अद्यापही सुरू झाली नसल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना भुर्दंड सोसावा लागत आहे. जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबई किंवा पुणे याठिकाणी जायचे असल्यास त्यांना पॅसेंजर गाडीने चाळीसगाव येथे जावे लागते. त्यानंतर तेथून पुढच्या टप्प्याचा प्रवास सुरू होतो. मात्र पॅसेंजर सुरू झाली नसल्याने प्रवाशांना एसटी किंवा खासगी बसेसने प्रवास करावा लागत आहे. खासगी बसेसचे जास्तीचे भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. चाळीसगाव-धुळे रेल्वेसेवा सुरू करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.
व्यापारी, रुग्ण व चाकरमान्यांचे हाल -
धुळे जिल्ह्यातून शिक्षण, व्यापार आणि वैद्यकीय उपचारासाठी मुंबई, पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यासाठी ते धुळे-चाळीसगाव रेल्वे आणि तेथून दादरपर्यंत पुढील रेल्वेने जातात. प्रवाशांना ही सुविधा देताना रेल्वे व्यवस्थापनाकडून धुळे रेल्वे स्थानकावर धुळे-चाळीसगाव रेल्वेला मुंबई, पुण्याचे कोच लावले जातात. नंतर ते दादरपर्यंत जाणाऱ्या रेल्वेला लावले जातात. मात्र धुळे-चाळीसगाव पॅसेंजर बंद असल्याने व्यापारी, विद्यार्थी, उपचारासाठी जाणारे रुग्ण व चाकरमान्यांचे हाल होत आहेत.
मागणीने धरला जोर -
पॅसेंजर गाडी सुरू करावी या मागणीने चांगलाच जोर धरला आहे. राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा या नुकतीच पुणे येथे खा. सुप्रिया सुळे यांची याबाबत भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. रेल्वेसेवा बंद असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. धुळे जिल्ह्यातून मुंबईला रोज सरासरी २५४, तर पुण्याला रोज सरासरी १५० प्रवासी जातात. परतणाऱ्यांची संख्या तितकीच आहे. आता मुंबई, पुण्याला जाणारी रेल्वे सुविधाच बंद झाल्याने यावर अवलंबून प्रवाशांचे हाल होत असून प्रवाशांना नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. तसेच गरजू रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
प्रतिक्रिया -
धुळे - चाळीसगाव रेल्वेसेवा बंद असल्याने हाल होत आहेत. वैद्यकीय उपचारांसाठी नेहमी मुंबई येथे जावे लागते. आता मात्र चाळीसगाव येथे बसने जातो व तेथून पुढचा टप्पा गाठतो. त्यामुळे जास्त पैसे खर्च होतात तसेच वेळेचाही अपव्यय होतो. धुळे - चाळीसगाव रेल्वेसेवा तत्काळ सुरू करून दिलासा द्यावा.
- संजय पाटील, प्रवासी
धुळे येथून जाणारी पॅसेंजर बंद असल्याने मोठा फटका बसला आहे. माझे व्यापारानिमित्ताने मुंबई-पुणे येथे नियमित जाणे होते. त्यासाठी चाळीसगाव येथे जाऊन पुढचा प्रवास करतो. आता मात्र रेल्वेसेवा बंद असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. इतर ठिकाणी गाड्या सुरू झाल्या असताना धुळे पॅसेंजर का सुरू झाली नाही, असा प्रश्न पडतो.
- कैलास पवार, प्रवासी