उस्मानाबाद : दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाच्या वतीने विविध याेजना हाती घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने दिव्यांगांच्या गटांना लघु उद्याेगासाठी अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिव्यांग निधीतील तरतूद यासाठी उपयाेगात आणली जाणार आहे. हा निर्णय शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी बैठकीला सुरूवात हाेताच काँग्रेसचे सदस्य बाबुराव चव्हाण यांनी ‘माझी कन्या भाग्यश्री’ या याेजनेचा मुद्दा उपस्थित केला. २०१९मध्ये लाभार्थ्यांची निवड करूनही २०२१ उजाडले तरी त्यांच्या नावे बँकेत एफडी करण्यात आलेली नाही. पैसे असतानाही महिला व बालकल्याण विभागाने याकडे डाेळेझाक का केली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावर प्रशासनाने बँकेकडे बाेट दाखविले. चर्चेअंती अध्यक्षा कांबळे यांनी सखाेल चाैकशीसाठी समिती नेमण्याचे आदेश दिले. यानंतर जिल्हा परिषदेच्या रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणांचा मुद्दा उपस्थित झाला असता, त्याबाबतही याेग्य त्या कार्यवाहीचे आदेश देण्यात आले.
यानंतर दिव्यांगांच्या गटांना लघु उद्याेग सुरू करण्यासाठी दिव्यांग निधीतून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचा मुद्दा मांडण्यात आला. यावर सविस्तर चर्चा झाली असता, त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यात २१२ गट आहेत. यापैकी महिला गटांना प्राधान्य द्यावे, अशी सूचना अध्यक्षा कांबळे यांनी केली. बैठकीस सभापती दिग्विजय शिंदे, दत्ता देवळकर, दत्ता साळुंके, सीईओ डाॅ. विजयकुमार फड यांच्यासह समितीवरील सदस्य, विभाग प्रमुख उपस्थित हाेते.