VIP दर्शनासाठी तरुण बनला तोतया 'IAS' अधिकारी; वडिलांनी पोलिसांचे पाय धरले तरी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 16:28 IST2025-12-24T16:26:52+5:302025-12-24T16:28:38+5:30
तुळजाभवानी मंदिरात बनावट आयडीसह दर्शनाचा डाव सुरक्षा यंत्रणेने उधळला

VIP दर्शनासाठी तरुण बनला तोतया 'IAS' अधिकारी; वडिलांनी पोलिसांचे पाय धरले तरी गजाआड
तुळजापूर (जि. धाराशिव) : आई राजा उधो-उधोच्या जयघोषात गजबजलेल्या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात 'आयएएस' अधिकारी असल्याची तोतयागिरी करून व्हीआयपी दर्शन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला मंदिर सुरक्षा यंत्रणेने रंगेहाथ पकडले. निखिल मदनलाल परमेश्वरी असे या तरुणाचे नाव असून, त्याच्याकडील बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे. मंदिर प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे या भामट्याचा डाव फसला असून, त्याला पुढील चौकशीसाठी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास निखिल परमेश्वरी हा तरुण आपल्या कुटुंबासह दर्शनासाठी आला होता. मंदिराच्या 'न्हानी गेट' परिसरात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांकडे त्याने, ‘‘मी आयएएस अधिकारी आहे, मला तातडीने आत सोडा,’’ असा आग्रह धरला. मात्र, त्याच्या वागण्यातील संशय आल्याने तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा निरीक्षकाने त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली.
निखिलने सुरुवातीला आत्मविश्वासाने गळ्यातील ओळखपत्र दाखवले. मात्र, सुरक्षा निरीक्षकाने त्याची बारकाईने पाहणी करताच तो हादरला. पकडले जाण्याच्या भीतीने त्याने आपली भूमिका बदलत ‘‘मी सध्या ट्रेनी (प्रशिक्षणार्थी) आयएएस आहे,’’ असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. या विसंगतीमुळे मंदिर जनसंपर्क अधिकाऱ्यांना (पीआरओ) पाचारण करण्यात आले. पीआरओ यांनी ओळखपत्राची तांत्रिक तपासणी केली असता, ते पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
वडिलांच्या विनवणीचा उपयोग झाला नाही
उघड्या पडलेल्या गुन्ह्यामुळे संशयित तरुणाची चौकशी सुरू झाली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. यावेळी सोबत असलेल्या त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाची चूक झाल्याचे मान्य करत पोलिसांचे पाय धरून माफी देण्याची विनंती केली. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर असल्याने मंदिर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तुळजापूर पोलिस ठाण्यात नेले.
प्रशासनाकडून कौतुक
मंदिर सुरक्षा यंत्रणा आणि पीआरओ विभागाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एक मोठा गैरप्रकार समोर आला आहे. ‘‘मी अधिकारी आहे’’ असे सांगून व्हीआयपी सुविधा लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना या कारवाईमुळे मोठा इशारा मिळाला आहे. सध्या संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.