उस्मानाबाद : एसटी महामंडळाने लांब पल्ला, आंतरराज्य, मध्यम आणि साध्या बसेस सुरू केल्या आहेत. मात्र ग्रामीण भागात अद्यापही बसेस जात नाहीत. त्यामुळे ग्रामीण प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे गाव तेथे एसटी हे ब्रीद नावालाच ठरत असल्याचे दिसून येत आहे.
मागील दीड वर्षापासून कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील वर्षी तब्बल पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. यंदाही मार्च महिन्यापासून कोरोनाने थैमान घातल्याने ४५ दिवस एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. जूनमध्ये कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने शासनाकडून निर्बंध शिथिल करण्यात आले.
यामुळे एसटीही पूर्ण क्षमतेने धावू लागली आहे. उस्मानाबाद विभागाअंतर्गत सहा आगारातून ४२२ बसेस धावत आहेत. कोरोना संकट काळापूर्वी सर्वच बसेस धावत होत्या. २ हजारांच्या जवळपास फेऱ्या दररोज होत होत्या. दररोज ५० लाखांचे उत्पन्न उस्मानाबाद विभागाला मिळत होते. कोरोना काळात विभागाला कोट्यावधी रुपयांचा फटका बसला. कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने राज्य शासनाकडून निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. एसटीची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. दररोज २९६ बसेस धावत असून, १ हजार १ हजार २०० फेऱ्या होत आहेत. मात्र प्रवासी संख्येअभावी अद्याप जिल्ह्यातील ग्रामीण भागात एसटी बसेस पोहोचत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना खासगी वाहन अथवा काळी-पिवळी, टमटमचा आधार घ्यावा लागत आहे.
खेडेगावात जाण्यासाठी टमटमचा आधार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड महिन्यानंतर एसटीची प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. दररोज २९६ बसेस धावत असून, १ हजार ते १ हजार २०० च्या जवळपास फेऱ्या होत आहेत. मात्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरू झाल्या नाहीत. यामुळे ग्रामीण प्रवाशांना काळी-पिवळी व टमटम वाहनांचा आधार घेत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.
८० हजार शहरात तर ३० हजार कि.मी.चा प्रवास ग्रामीण भागात
उस्मानाबाद विभागातील सहाही आगारात मिळून २९६ च्या जवळपास बस सोडल्या जात आहेत. दररोज १ हजार ते १ हजार २०० फेऱ्या होत आहेत. दररोजचा १ लाख २० हजार किमीचा प्रवास होत आहे. यात शहरी भागात ८० हजार तर ग्रामीण भागात ३० हजार किमीचा प्रवास आहे. ग्रामीण भागात कोरोनापूर्वी ९९ बसेस धावत होत्या. सध्या केवळ ५० बसेस धावत आहेत.
कोट...
उस्मानाबाद आगाराच्या ग्रामीण भागात १८ बसेस धावत असतात. सध्या १२ बसेस सुरू आहेत. तर मुक्कामी १० पैकी ६ गाड्या मुक्कामी जात आहेत. ज्या मार्गावरील शाळा सुरू झाल्या आहेत. त्या ठिकाणच्या बसफेऱ्या लवकर सुरू केल्या जाणार आहेत. सध्या सर्वच मार्गावरील बसेस सुरू आहेत. फेऱ्या कमी आहेत.
पांडुरंग पाटील, आगार प्रमुख उस्मानाबाद
खेडेगावांवरच अन्याय का
कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे एसटी सेवा दीड महिने बंद होती. आता एसटीची वाहतूक पूर्वपदावर आलेली आहे. तालुक्याच्या ठिकाणी बसेस पोहोचत असताना, ग्रामीण भागात अद्याप बसफेऱ्या सोडण्यात येत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
खरीप हंगाम तोंडावर असताना कोरोना संकटामुळे एसटी सेवा बंद होती. त्यामुळे शेतीसाठी लागणारे, बी-बियाणे अवजारे खरेदीवर मोठा परिणाम झाला. शहराच्या ठिकाणी बसफेऱ्या सोडल्या जात असताना, ग्रामीण भागावरच अन्याय का, ग्रामीण जनतेची गैरसोय टाळण्याकरिता बसफेऱ्या पूर्ववत कराव्या.