सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देणारे मतचोर कुठे पळाले?; उद्धव ठाकरेंचा तुफानी हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 17:43 IST2025-11-06T17:40:10+5:302025-11-06T17:43:10+5:30
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या.

सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देणारे मतचोर कुठे पळाले?; उद्धव ठाकरेंचा तुफानी हल्ला
- बालाजी बिराजदार
लोहारा (धाराशिव): 'सातबारा कोरा करतो' असे निवडणुकीपूर्वी आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या सरकारने आता शेतकऱ्यांच्या समस्यांकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. हे सरकार केवळ 'मतचोर' आणि 'दगाबाज' आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा पाटोदा चौरस्ता येथे जोरदार हल्लाबोल केला.
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी उपमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'टोमणे मारण्याशिवाय दुसरं काय येतं' या टीकेला रोखठोक उत्तर दिले. "शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, हे टोमणा आहे का? शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या, हे टोमणा आहे का? हा टोमणा नाही, पण टोला मात्र नक्कीच मारणार आहे," असे सांगत ठाकरे यांनी आपल्या मागण्यांचा पुनरुच्चार केला.
अजित पवारांना थेट आव्हान
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीपूर्वी 'तुमचा सातबारा कोरा केल्याशिवाय पवारांचा अवलाद सांगणार नाही' असे केलेले विधान उद्धव ठाकरे यांनी यावेळी आठवण करून दिली. "निवडणूक आली की लोकांच्या कोपऱ्याला गूळ लावतात. आता सत्तेत आल्यावर कर्जाचे पैसे भरा म्हणतात. मग आता कोणाची अवलाद लावणार?" असा थेट सवाल त्यांनी अजित पवारांना केला.
'कागदावर मदत, खिशात एक पैसा नाही!'
उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले की, सरकारने जाहीर केलेली मदत केवळ कागदावर आहे, एकाही शेतकऱ्याच्या खिशात एक पैसाही गेलेला नाही. शेतकऱ्यांसाठी केलेली सर्व आश्वासने फसवी ठरली आहेत. ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले: "या दगाबाज सरकारला दगा दिलाच पाहिजे. जोपर्यंत आमचे कर्ज माफ होत नाही, तोपर्यंत आम्ही महायुतीला मतदान करणार नाही, असे यांना ठणकावून सांगा."
याप्रसंगी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, माजी आमदार दिनकर माने, शामलताई वडणे, जिल्हा प्रवक्ते जगदिश पाटील, तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्यासह शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना लाकडी नांगर भेट देण्यात आला.