अनियंत्रित दुचाकी उड्डाणपुलावरून कोसळली; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी
By चेतनकुमार धनुरे | Updated: April 6, 2023 15:12 IST2023-04-06T15:12:23+5:302023-04-06T15:12:49+5:30
सोलापूर-धुळे महामार्गावरून जात असताना तेरखेडा येथे असलेल्या उड्डाणपुलावर झाला अपघात

अनियंत्रित दुचाकी उड्डाणपुलावरून कोसळली; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी
पारगाव (जि. धाराशिव) : वाशी तालुक्यातील पिंपळगाव (क) येथील दोन तरुण बुधवारी दुपारी दुचाकीने धाराशिवकडे निघाले होते. सोलापूर-धुळे महामार्गावरील तेरखेडा येथील उड्डाणपुलावर नियंत्रण सुटल्याने दुचाकी कठड्यास धडकली. यामुळे दोन्ही तरुण पुलावरुन खाली कोसळले. यातील एकाचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत.
पिंपळगाव (क) येथील अविनाश हरिश्चंद्र जोगदंड (२०) व अक्षय संदीपान जोगदंड (२०) हे दोघे त्यांच्याकडील दुचाकीवरून (क्र. एमएच २५ एवाय ११५०) बुधवारी दुपारी धाराशिवच्या दिशेने निघाले होते. सोलापूर-धुळे महामार्गावरून जात असताना तेरखेडा येथे असलेल्या उड्डाणपुलावर वेगावर नियंत्रण न राहिल्याने दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली. या धडकेमुळे दोन्ही तरुण उडून पुलाच्या खाली कोसळले. परिणामी, त्यांना गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी लागलीच रुग्णवाहिका बोलावून दोघांनाही धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी पाठवून दिले. दरम्यान, उपचार सुरू असतानाच जखमी अविनाश हरिश्चंद्र जोगदंड हा तरुण गुरुवारी सकाळी मृत्युमुखी पडला. तर अक्षय जोगदंड गंभीर जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद गुरुवारी येरमाळा ठाण्यात करण्यात आली आहे.