उस्मानाबादेत वीज पडून दोन महिला ठार; तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 15:15 IST2018-06-21T15:13:11+5:302018-06-21T15:15:31+5:30
वाणेवाडी येथे आज दुपारी शेतीत काम करीत असताना वीज कोसळून दोन शेतमजूर महिला ठार झाल्या़ तर सोबतच्या अन्य तीन महिला जखमी झाल्या.

उस्मानाबादेत वीज पडून दोन महिला ठार; तिघे जखमी
उस्मानाबाद : तालुक्यातील वाणेवाडी येथे आज दुपारी शेतीत काम करीत असताना वीज कोसळून दोन शेतमजूर महिला ठार झाल्या़ तर सोबतच्या अन्य तीन महिला जखमी झाल्या.
वाणेवाडी येथील शालुबाई बबन पवार (५०), शीतल तुळशीराम घुटुकडे (३२) यांच्यासह श्यामल लहु सरवदे (४०), कौशल्या शेषेराव सरवदे (४५) व छाया भास्कर सरवदे (५०) या महिला वाणेवाडी शिवारातील शेतीत मशागतीचे काम करीत होत्या़ दरम्यान, दुपारी वाऱ्यासह आभाळ भरुन आले़ १.२० वाजण्याच्या सुमारास महिला काम करीत असलेल्या ठिकाणी अचानक वीज कोसळली़ या घटनेत शालुबाई पवार व शीतल घुटुकडे यांचा जागीच मृत्यू झाला़ तर अन्य तिघी जखमी झाल्या आहेत़ त्यांना उपचारासाठी तेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ मयत शालुबाई यांच्या पश्चात एक मुलगा व दोन विवाहित मुली आहेत, तर शीतल घुटुकडे यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे़