उमरगा : तालुक्यात गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून कोविड रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने, प्रतिबंधात्मक प्रशासनाने उपाययोजना करण्यासाठी पूर्व तयारी हाती घेतली आहे. यासाठी डॉक्टरांसह १८ नवीन आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, आणखीन ८ डॉक्टरांसह १६ आरोग्य कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे, तसेच कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी तालुक्यातील दोन इमारतींचे अधिग्रहन करून ईदगाह मैदान येथील कोविड केअर सेंटर चालू करण्यात आले आहे.
उमरगा येथील ईदगाह मैदान व श्री छत्रपती शिवाजी कॉलेज मुलींचे वसतिगृह या इमारती कोविड केअर सेंटरसाठी अधिग्रहित करण्यात आल्या असून, येथे ७० बेडची व्यवस्था होणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी जारी केले आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी त्यांना दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार यंत्रणा स्थापन केली असून, या केंद्रावर सनियंत्रण करण्यात येत आहे. याबाबतची माहिती डॅशबोर्डवर अद्ययावत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. उमरगा येथील ईदगाह कोविड केंद्रावर मंगळवारी २ वैद्यकीय अधिकारी, वाॅर्ड बॉय, नर्स असे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सध्या येथे ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था उपजिल्हा रुग्णालय कँटीनकडे देण्यात आली आहे, तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जारद्वारे उपजिल्हा रुग्णालयामार्फत करण्यात येत आहे.
जिल्हा शल्य चिकित्सकांनी तातडीने ४ वैद्यकीय अधिकारी, नर्स ३, एनएम, डाटा ऑपरेटर अशा १० कर्मचाऱ्यांची नवीन नियुक्ती उमरग्यासाठी केली आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी, जि.प. कार्यालय आणि संबंधित इन्सिडंट कमांडर यांना देण्यात आली आहे. सर्व केंद्रावर नियंत्रण करण्याची सर्वसाधारण जबाबदारी डी.सी.सी.सी. नोडल अधिकारी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी पाहणार आहेत. स्थानिक पातळीवर वैद्यकीय साहाय्य उपलब्ध करून देणे, तेथे नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून काम करून घेणे व आवश्यक तो औषध पुरवठा करून घेणे ही जबाबदारी संबंधित वैद्यकीय अधीक्षकांची यांची आहे.
मध्यंतरी कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने, उमरगा उपजिल्हा रुग्णालय नॉन कोविड करण्यात आले होते. मात्र, सध्याची वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता, उपजिल्हा रुग्णालय पुन्हा कोविड रुग्णालय करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोट...........
उमरगा तालुक्यात अलीकडील काळात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामुळे यापूर्वी बंद करण्यात आलेले ईदगाह कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहे, तसेच पुन्हा चार वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १० वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वाढती कोरोनाबधितांची संख्या विचारात घेऊन आणखीन ८ वैद्यकीय अधिकाऱ्यासह १६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर करून स्वतःचे रक्षण करावे.
- डॉ.अशोक बडे, वैद्यकीय अधीक्षक, उमरगा
१५ बाधितांची भर
उमरगा तालुक्यात मंगळवारी १५ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. आतापर्यंत ५ हजार ३४७ रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात आल्या असून, त्यामध्ये ५३६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत, तसेच ९ हजार ४५ आरटीपीसीआर स्वॅब घेण्यात आले. त्यामध्ये १,४६० व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. आतापर्यंत तालुक्यात ५८ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी घेण्यात आलेल्या २३ रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये ७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहेत. यात समुद्राळ, कदेर, पोलीस लाइन, बालाजीनगर, भुसणी, बेडगा, नळगाव येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. मंगळवारी रात्री ६६ स्वॅबचे अहवाल आले असून, त्यामध्ये ८ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यामध्ये एसटी आगारातील ५, बालाजी नगरातील २, तलमोड शाळेतील एकाचा समावेश आहे. सध्या ३५ रुग्णांवर उपचार सुरू असून, २४ कोरोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.