तुळजापूरला अवकाळीने झोडपले;काढणीला आलेल्या पिकाचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 10:54 IST2020-03-25T10:50:09+5:302020-03-25T10:54:29+5:30
ज्वारीसह गव्हाचे मोठे नुकसान

तुळजापूरला अवकाळीने झोडपले;काढणीला आलेल्या पिकाचे मोठे नुकसान
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर तालुक्यात मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे रबी हंगामातील काढणीला आलेल्या व काढणी सुरू असलेल्या ज्वारीसह गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे. मंगरूळ सर्कलमध्ये सर्वाधिक 45 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
तुळजापूर तालुक्यात सध्या ज्वारी तसेच गव्हासह रबीच्या अन्य पिकाची काढणी सुरू आहे. काही शेतकऱ्यांची काढलेली पिके शेतातच आहेत. असे असतानाच मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. मंगरूळ महसूल मंडळात (सर्कल) सर्वाधिक 45 पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे रब्बी पिकांचे सर्वाधिक नुकसानही याच मंडळात झाल्याचे शेतकरी सांगताहेत. सावरगाव आणि इटकळ याही सर्कलमध्ये पाऊस झाला. येथे अनुक्रमे 19 व 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे तहसील प्रशासनाकडून सांगण्यात आले. तुळजापूर, नळदुर्ग, जळकोट आणि सलगरा (दि.) या सर्कलमध्ये मात्र दखलपात्र पाऊस झालेला नाही. त्यामुळे उपरोक्त सर्कलमध्ये पिकांचे फारसे नुकसान झाले नसल्याचे समजते.
द्राक्ष बागांनाही फटका...
तुळजापूर तालुक्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक शेतकरी परदेशात द्राक्ष निर्यात करतात. कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या साथीमुळे द्राक्ष निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकरी स्थानिक बाजारपेठेत कवडीमोल दराने द्राक्ष विक्री करीत असतानाच आता अवकाळीने झोडपले. त्यामुळे शेतकरी अधिकच्या संकटात सापडले आहेत. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.