दरोड्यासाठी सांगलीहून आले धाराशिवमध्ये, पोलिसांच्या गस्ती दरम्यान तिघे जाळ्यात अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 18:52 IST2025-03-25T18:52:16+5:302025-03-25T18:52:46+5:30
धाराशिव तालुक्यातील ढोकी परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या गस्ती पथकाने घेतले ताब्यात

दरोड्यासाठी सांगलीहून आले धाराशिवमध्ये, पोलिसांच्या गस्ती दरम्यान तिघे जाळ्यात अडकले
धाराशिव : सांगली जिल्ह्यातील ती दरोडेखोर त्यांच्या दोन अन्य सथीदारांसह धाराशिव जिल्ह्यात दरोड्याच्या तयारीने आले होते. मात्र, गुन्हे शाखेच्या पोलिसांची सोमवारी गस्त सुरू असताना त्यांच्या निदर्शनास आले अन् तिघे गजाआड झाले. त्यांच्याकडून पोलिसांनी दरोड्यासाठी वापरात येणारे साहित्यही जप्त केले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक सोमवारी पहाटे रात्र गस्तीवर धाराशिव तालुक्यातील ढोकी परिसरात होते. तेथील तेरणा कारखान्याच्या परिसरातील तेरणा शाळेच्या फलकाजवळ हे पथक आले असता तेथे पाच जण अंधारात संशयितरीत्या थांबल्याचे निदर्शनास आले. पथकातील सहायक निरीक्षक सुदर्शन कासार यांच्यासह कर्मचारी शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, रत्नदीप डोंगरे, नितीन भोसले यांनी या संशयितांची विचारपूस करण्यासाठी वाहन थांबवून त्यांच्या दिशेने जात असताना दोघांनी दुचाकी सुरू करून तेथून धूम ठोकली. पाठोपाठ संतोष प्रभाकर कुराडे, अविनाश प्रभाकर कुराडे (रा. अंकलखोप, ता. पलूस, जि. सांगली) व प्रवीण राजाराम मोरे (रा. चांदोल वसाहत, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली) हे तिघेही दुचाकीवरून पळून जात असताना पोलिसांनी त्यांच्यावर झडप टाकून पकडले. या तिघांचीही झडती घेतली असता त्यांच्याकडे कत्ती, कटावणी, कटर असे दरोड्याचे साहित्य आढळून आले. सोबतच पोलिसांनी त्यांच्याकडील तीन मोबाइल व एक दुचाकी, असा ९० हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध सपोनि. कासार यांच्या फिर्यादीवयन ढोकी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी त्यांना ढोकी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
धाराशिवचे कनेक्शन काय ?
पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी यापूर्वीही धाराशिव तसेच सांगली जिल्ह्यात दरोडे, जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर दोन्ही जिल्ह्यांत गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या आरोपींकडून जप्त करण्यात आलेली दुचाकी ही धाराशिव पासिंगची आहे. ही दुचाकी नेमकी कोणाची, त्यांचे साथीदार स्थानिक आहेत काय, याचा तपास करतानाच धूम ठोकलेल्या आरोपींना पकडण्याचे आव्हानही पोलिसांपुढे असणार आहे.