बकऱ्या चोरताना प्रतिकार केल्याने चोरट्यांनी हल्ला करून शेतकऱ्याचा केला खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 19:47 IST2025-03-04T19:47:09+5:302025-03-04T19:47:20+5:30
खून केल्यानंतरही बकऱ्या नाही सोडल्या; हिंगळजवाडीची घटना, चौघांवर गुन्हा दाखल

बकऱ्या चोरताना प्रतिकार केल्याने चोरट्यांनी हल्ला करून शेतकऱ्याचा केला खून
तेर (जि. धाराशिव) : पत्र्याच्या शेडमधून बकऱ्या चोरून नेत असताना, शेतकऱ्याने प्रतिकार केल्यामुळे चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात संबंधित शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना धाराशिव तालुक्यातील हिंगळजवाडी येथे रविवार व सोमवारच्या मध्यरात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
हिंगळजवाडी येथील शेतकरी तानाजी भगवान मुळे यांची गावाच्या शिवारात शेती आहे. शेतीतील पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी बकऱ्या व शेळ्या बांधून ठेवल्या होत्या. नेहमीप्रमाणे रविवारी रात्री ते शेताकडे मुक्कामी गेले होते. दरम्यान, मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चार चोरट्यांनी त्यांच्या शेतातील पत्र्याचे शेड उचकटून आतील बकऱ्या पळविण्याचा प्रयत्न केला. आवाजाने जागे झालेले शेतकरी तानाजी मुळे यांनी चोरट्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, चारही चोरट्यांनी त्यांच्यावर प्रतिहल्ला चढविला. लाथा-बुक्क्यांसोबतच दगडाने जबर मारहाण केल्यामुळे मुळे यांचा जागीच मृत्यू झाला.
हा प्रकार सकाळी लक्षात आल्यानंतर मयताचा मुलगा विजय मुळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ढोकी ठाण्यात आरोपी संजय राजेंद्र पवार, जितू प्रभू पवार (दोघे रा.तेर), अमोल ईश्वर काळे, ईश्वर रामा काळे (दोघे रा. हिंगळजवाडी) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती कळल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार, ढोकी ठाण्याचे सपोनि. विलास हजारे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली व आरोपींचा शोध सुरू केला.
खून केल्यानंतरही बकऱ्या नाही सोडल्या
चारही आरोपींनी शेतकरी तानाजी मुळे यांना दगडाने जबर मारहाण केली. या मारहाणीत काही वेळातच मुळे गतप्राण झाले. यानंतरही चोरट्यांनी शेडमधील २ बकरे व २ शेळ्या, असे ३४ हजार रुपये किमतीचे पशुधन चोरून नेले. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.