तुळजाभवानीस श्रीकृष्णने भेट दिलेल्या मुरलीचा अलंकार, हजारो भाविकांनी घेतले दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 13:28 IST2025-09-27T13:25:34+5:302025-09-27T13:28:40+5:30
नवरात्रीची सहावी माळ; मुरली अलंकार महापूजेचे हजारो भाविकांनी घेतले विहंगम दर्शन

तुळजाभवानीस श्रीकृष्णने भेट दिलेल्या मुरलीचा अलंकार, हजारो भाविकांनी घेतले दर्शन
- गोविंद खुरूद
तुळजापूर (धाराशिव): शारदीय नवरात्र उत्सवातील सहावी माळ (शनिवार) या निमित्ताने आज तुळजाभवानी मातेची अत्यंत मनमोहक 'मुरली अलंकार विशेष महापूजा' मांडण्यात आली होती. रात्री दोन वाजता मंदिर भाविकांसाठी खुले झाल्यानंतर हजारो देवीभक्तांनी भक्तीभावाने या विशेष रूपाचे दर्शन घेतले.
सकाळी नित्य उपचार अभिषेक पूजा आणि सिंहासन पूजा पार पडल्यानंतर भोपे पुजारी बांधवांनी तुळजाभवानी मातेची मुरली अलंकार महापूजा बांधली. या पूजेत तुळजाभवानीला राखाडी रंगाचे महावस्त्र नेसवून, त्यावर विविध हिरे, मोती आणि सोन्याचे अलंकार घालण्यात आले होते. या अलंकाराचे मुख्य आकर्षण म्हणजे देवीच्या दोन्ही हातांमध्ये बासरी (मुरली) ठेवण्यात आली होती, ज्यात तुळजाभवानी बासरी वाजवत आहे, असे मनमोहक रूप साकारले गेले. या बासरीच्या सुराने पृथ्वीतलावरील देवीभक्त तल्लीन होतात, अशी भावना या पूजेतून व्यक्त होते.
मुरली अलंकाराचे वैशिष्ट्य, श्रीकृष्णाने दिली होती मुरली
या महापुजेला मोठे धार्मिक महत्त्व आहे. धार्मिक आख्यायिकेनुसार, भगवान श्रीकृष्ण यांनी तुळजाभवानी मातेस आपली मुरली (बासरी) भेट दिली होती. त्याच प्रसंगाची आठवण म्हणून शारदीय नवरात्र उत्सवात तुळजाभवानी मातेची मुरली अलंकार पूजा मांडली जाते.
वाघ वाहनावर छबिना
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळची अभिषेक पूजा संपताच तुळजाभवानीचा वाघ या वाहनावर छबिना काढण्यात आला होता. विधिवत पूजा आणि श्रीफळ वाढवल्यानंतर या वाहनाने मंदिरास प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी उपस्थित देवीभक्तांनी पोत ओवाळून तुळजाभवानीच्या गजरात देवीचे दर्शन घेतले, ज्यामुळे मंदिर परिसरात भक्तीचा उत्साह ओसंडून वाहत होता.