भूममध्ये नगरसेवकांचे अनोखे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीचा 'बेशरम'चं झाड ठेऊन सत्कार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 17:34 IST2026-03-10T17:34:15+5:302026-03-10T17:34:46+5:30
दोन महिन्यांहून अधिक काळ लोटूनही प्रभारी मुख्याधिकारी पालिकेत नियमित उपस्थित राहत नसल्याची तक्रार

भूममध्ये नगरसेवकांचे अनोखे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीचा 'बेशरम'चं झाड ठेऊन सत्कार!
भूम (जि. धाराशिव): शहरातील प्रशासकीय कामकाजात सातत्याने होणाऱ्या विलंबामुळे आणि प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे संतप्त झालेल्या १४ नगरसेवकांनी आज भूम नगरपालिकेत एक अनोखे आंदोलन केले. जनशक्ती नगर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी प्रभारी मुख्याधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीचा 'बेशरम'च्या झाडाने सत्कार करत प्रशासनाच्या उदासीनतेवर जोरदार प्रहार केला.
काय आहे नेमके प्रकरण?
नगरपरिषदेचे कायमस्वरूपी मुख्याधिकारी वैद्यकीय रजेवर गेल्याने हे पद रिक्त झाले होते. सध्या या पदाचा अतिरिक्त पदभार तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार प्रवीण जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, दोन महिन्यांहून अधिक काळ लोटूनही प्रभारी मुख्याधिकारी पालिकेत नियमित उपस्थित राहत नसल्याची तक्रार नगरसेवकांनी केली आहे. आठवड्यातून किमान दोन दिवस तरी पालिकेत पूर्णवेळ उपस्थित राहावे, ही मागणी प्रशासनाने वारंवार डावलल्याने नगरसेवकांचा संयम सुटला.
प्रलंबित कामांमुळे नागरिक हैराण
मुख्याधिकारी वेळेवर उपस्थित नसल्याने नागरिकांच्या विविध कामांच्या फाईल्स प्रलंबित आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. "आम्ही वारंवार विनंती करूनही प्रशासन लक्ष देत नाही, त्यामुळे आम्हाला हा उपरोधिक मार्ग स्वीकारावा लागला," असे नगरसेवकांनी सांगितले. जनशक्ती आघाडीचे गटनेते रुपेश शेंडगे यांनी इशारा दिला आहे की, जर प्रशासनाने तातडीने सुधारणा केली नाही, तर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल.