भरधाव टेम्पो-कारचा भीषण अपघात; कारमधील रेणापूरचे तिघे जागीच ठार
By राजकुमार जोंधळे | Updated: March 17, 2025 13:43 IST2025-03-17T13:42:06+5:302025-03-17T13:43:51+5:30
लातूर-बार्शी महामार्गावरील घटना...

भरधाव टेम्पो-कारचा भीषण अपघात; कारमधील रेणापूरचे तिघे जागीच ठार
धाराशिव / ढोकी : धाराशिव येथे सी.एन.जी. घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पो अन् कारची समोरासमोर टक्कर होऊन कारमधील कारचालकासह तिघे जागीच ठार झाले आहेत. रविवार, १६ मार्च रोजी रात्री ११:२० च्या सुमारास लातूर-बार्शी महामार्गावर ढोकी येथील राधिका हाॅटेलसमोर हा भीषण अपघात झाला.
कळंब तालुक्यातील रांजणी येथून रविवारी रात्री एन. साई कारखान्यातून धाराशिव येथील नॅचरल सी.एन.जी. पंपात सी.एन.जी.भरुन आयशर टेम्पो (एम.एच. २४ ए.यू. ६७२२) धाराशिवकडे निघाला हाेता. दरम्यान, ढोकी गावानजीक राधिका हाॅटेल समोर टेम्पो आपल्यानंतर पुणे येथून लातूरच्या दिशेने जात असलेली कार (महाराष्ट्र १४. ई क्यू.११२२) या दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. यात कारची समोरील बाजू पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. या अपघातात कारमधील चालकासह तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये कारचालक केशव वाघमारे (३७), नितीन जटाळ (४७), रामेश्वर वैजनाथ सुरवसे (४५, तिघेही रा. कामखेडा ता. रेणापूर) यांचा समावेश असल्याचे ढोकी येथील पोलिसांनी रात्री उशिरा सांगितले.