मौनातून बाहेर येताच तानाजी सावंतांना घातला वादाने 'कर्क'विळखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 10:14 IST2020-02-08T10:13:43+5:302020-02-08T10:14:14+5:30
बोलता-बोलता त्यांनी मित्रपक्षालाच अंगावर घेतल्याने त्यांचे बोल पुन्हा वादग्रस्त ठरले आहेत.

मौनातून बाहेर येताच तानाजी सावंतांना घातला वादाने 'कर्क'विळखा
उस्मानाबाद : परंड्याचे आमदार तानाजी सावंत आणि त्यांच्या शब्दांना जणू वादाचा कर्कविळखाच बसला आहे. ते जेव्हा-केव्हा बोलतात, तेव्हा त्यांच्या शब्दांसोबतच वादही बाहेर पडतो. दीर्घ काळानंतर नकतेच त्यांनी मौन सोडले होते. यावेळी बोलता-बोलता त्यांनी मित्रपक्षालाच अंगावर घेतल्याने त्यांचे बोल पुन्हा वादग्रस्त ठरले आहेत.तानाजी सावंत धडाकेबाज राजकारणी म्हणून जितके ओळखले जातात तितकेच ते बेधडकही समजले जातात. एखादी गोष्ट पटली नाही तर, कोणताही मुलाहिजा न बाळगता सावंत कोणावरही आपले 'वाक्बाण' चालवतात. या त्यांच्या 'बाण्या'मुळे अनेकदा 'धनुष्याची'ही कोंडी झालेली आहे.
नजिकच्या काळात ते त्यांच्या तिवरे धरण खेकड्यांनी फोडल्याच्या विधानावरुन पहिल्यांदा वादात अडकले होते. या विधानास बेजबाबदार ठरवून त्यांच्याविरुद्ध सर्वाधिक आक्रमक पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला होता. अगदी त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी खेकडे सोडून आंदोलनही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या 'भिखारी' शब्दांवरुनही मोठा गजहब माजविण्यात आला होता. याहीवेळी राष्ट्रवादीच त्यांच्याविरुद्ध अग्रस्थानी होती. शिवाय, त्यांच्या परंडा मतदारसंघात विधानसभेला विरोधात राष्ट्रवादीच असल्याने सावंत व राष्ट्रवादीच्या नेते, पदाधिकाऱ्यांचा छत्तीसचा आकडा आहे.
महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर सावंतांना मंत्रीपद मिळू नये, यासाठी स्वपक्षातील काही नेते जितके प्रयत्नशील होते, त्यापेक्षा काकणभर जास्त राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करीत होते. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लॉबिंग झाल्याची चर्चा खुलेपणाने होत होती. याचदरम्यान, त्यांना मंत्रीमंडळातन डावलण्यात आले. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी खटकल्याचे तेव्हा बोलले गेले.
मात्र, सावंत यांचा ठाकरे यांच्यापेक्षाही जास्त राग कदाचित राष्ट्रवादीवरच असावा, हे त्यांच्या बोलण्यातून जाणवते आहे. सरकारच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच मतदारसंघात येत असताना त्यांनी आपण नाराज नसल्याचे सांगत दीर्घकाळाचे मौन सोडले. यानंतर भूम येथील एका सत्कार समारंभाच्या अनौपचारिक बैठकीत त्यांनी सध्या मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेतले. मराठवाड्यावर पन्नास वर्षे अन्याय झाल्याचे सांगत याला राष्ट्रवादी जबाबदार असल्याचे विधान केले होते. शिवाय, अजित पवार यांचा नामोल्लेख टाळत वाटरग्रीड योजनेला खीळ घातली तर मराठवाडा पेटून उठेल, असा इशारा दिल्याचा एक व्हिडिओ वायरल झाला आहे.
या विधानांना 'हायलाईट'करुन तानाजी सावंत यांच्यासमोर पुन्हा एक नवा वाद उभा करण्यात आला आहे. दरम्यान, याची उलटसुलट चर्चा झडू लागल्यानंतर लगेचच त्यांनी सोशल मिडीयाद्वारे आपल्या वक्तव्यांची मोडतोड करुन विपर्यास करण्यात आल्याचा खुलासा केला आहे. २१ टीएमसी पाण्याच्या बदल्यात गरज पडल्यास आपण राजीनामाही द्यायला तयार असून, या पाण्यासाठी आपला आग्रह कायम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या त्यांच्या स्पष्टीकरणाने वादाचे वादळ शमणार का. हे पाहणे औत्सक्याचे ठरेल.