धाराशिवच्या डीपीसी निधीवरील स्टे उठणार; भाजप-शिंदेसेनेत पॅचअपची अजित पवारांमुळे चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 18:13 IST2025-08-07T18:10:18+5:302025-08-07T18:13:49+5:30
धाराशिव जिल्हा नियोजन समितीचा २०२४-२५ या आर्थिक वर्षातील सुमारे अडीचशे कोटींचा निधी शिल्लक होता.

धाराशिवच्या डीपीसी निधीवरील स्टे उठणार; भाजप-शिंदेसेनेत पॅचअपची अजित पवारांमुळे चर्चा
धाराशिव : २०२४-२५ या संपलेल्या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन समितीच्या सुमारे अडीचशे कोटींच्या निधीला राज्य शासनाने स्थगिती दिली आहे. निधी वाटपातील गडबडीचा दाखला देत भाजपने पालकमंत्र्यांची तक्रार केल्यानंतर भाजप व शिंदेसेनेत वादाची ठिणगी पडली. मात्र, मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निधीवरील स्थगिती उठविण्यात येत असल्याचे जाहीर केल्याने भाजप-शिंदेसेनेत पॅचअप झाल्याची चर्चा होत आहे.
धाराशिव जिल्हा नियोजन समितीचा २०२४-२५ या आर्थिक वर्षातील सुमारे अडीचशे कोटींचा निधी शिल्लक होता. विधानसभा निवडणुकीनंतर पालकमंत्री म्हणून शिंदेसेनेच्या प्रताप सरनाईकांची वर्णी लागली. अखेरच्या टप्प्यात या निधीतून घाईगडबडीत कामांना मंजुरी दिल्याचा व त्यात गडबडी झाल्याचा दावा करीत भाजपचे काही पदाधिकारी मुख्यमंत्र्यांकडे धडकले. यानंतर लागलीच १ एप्रिल रोजी या निधीला स्थगिती देणारे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. तेव्हापासून या निधीवरील स्थगिती उठलेली नाही. यादरम्यानच्या काळात भाजप व शिंदेसेनेत यावरून बराच कलगीतुरा झाला. मात्र, १२७ दिवसांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५ ऑगस्ट रोजी या निधीवरील स्थगिती उठवीत असल्याचे जाहीर केले. यासाठी पालकमंत्री सरनाईक यांना सोबत घेऊन बैठक झाल्याचा दाखलाही त्यांनी दिला. त्यामुळे जिल्ह्यात भाजप व शिंदेसेनेत पॅचअप झाल्याची चर्चा रंगली आहे.
सूत्रावरून निधीचे गणितच बिघडले
नियोजन समितीच्या निधी वाटपाचे प्राधान्यक्रम, लोकसंख्येचा निकष, असे काही संकेत व नियमही आहेत. मात्र, सहसा ते कोठे पाळले जात नाही. सत्ताधारी व विरोधकांच्या निधीचे सूत्र ठरवून त्यानुसार ते वाटप केले जाते. दरम्यान, शिंदेसेनेच्या पालकमंत्र्यांनी ठाकरे सेनेला सूत्रात झुकते माप दिल्याची चर्चा तेव्हा झाली. स्थगितीला याचीही एक किनार आहे. त्यामुळे निधीच गोठवला गेला.
नव्या सूत्राची कार्यकर्त्यांना उत्सुकता
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत निधी वाटपाचे सर्वानुमते नवे सूत्र ठरल्याचेही सांगितले. त्यामुळे हे नवे सूत्र कसे असणार, कोणाचा वाटा वाढणार, कोणाचा घटणार, याची कार्यकर्त्यांमध्ये चवीने चर्चा होत आहे. दरम्यान, बुधवारी नियोजन विभागात स्थगितीबाबत चौकशी केली असता अद्याप शासन स्तरावरून कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नसल्याची माहिती मिळाली.
सत्कार समारंभातही दिले स्थान
तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी जवळपास २ हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. याअनुषंगाने गुरुवारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आराखडा मंजुरीसाठी पाठपुरावा करणारे स्थानिक आमदार राणाजगजितसिंह पाटील तसेच आराखडा समितीचे अध्यक्ष पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा नागरी सत्कार होत आहे. सरनाईक यांचा दौरा उशिरापर्यंत निश्चित झालेला नव्हता. मात्र, या सत्कार समारंभाच्या माध्यमातून दिलजमाईचाही प्रयत्न दिसून येत आहे.