भाविकांवर काळाचा घाला; भरधाव जीपचे टायर फुटले, सिन्नरच्या तिघांचा धाराशिवमध्ये मृत्यू
By बाबुराव चव्हाण | Updated: March 21, 2023 16:02 IST2023-03-21T16:01:11+5:302023-03-21T16:02:37+5:30
तामलवाडीनजीक भीषण अपघात, अन्य तिघे भाविक जखमी आहेत

भाविकांवर काळाचा घाला; भरधाव जीपचे टायर फुटले, सिन्नरच्या तिघांचा धाराशिवमध्ये मृत्यू
धाराशिव/तामलवाडी : श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरकडे येत असताना टायर फुटून भरधाव जीव रस्त्यालगतच्या खड्डयात पडली. या भीषण अपघातात सिन्नर येथील तिघेजण जागीच ठार झाले. तर अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील तामलवाडीनजीक घडली.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील चास्नकावाडी, चासगाव येथील भाविक जीपने श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येत हाेते. त्यांची जीव मंगळवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तामलवाडीनजीक आली असता, अचानक जीपचे टायर फुटले. यानंतर ही जीव रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात काेसळली. या भीषण अपघातात निखील सानप (२४), अनिकेत भाबड (२४) आणि शाम खैरनार (२६, सर्व रा.चास्नकावाडी, ता. सिन्नर) हे तिघेजण जागीच ठार झाले. तर जीवन ढाकणे (२४), जीवन बबन बिडगर (२६), तुषार दत्तात्रय बिडगर (२७, सर्व रा. चासगाव, ता. सिन्नर) हे तिघेजण गंभीर जखमी आहेत.
या तिघांनाही तातडीने साेलापूर जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघाती घटनेची माहिती मिळताच धाराशिवच्या अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत, उप विभागीय पोलीस अधिकारी सई भोर-पाटील, सपोनि सचिन पंडित, पोलीस कर्मचारी आनंद गायकवाड, मिथुन गायकवाड, सुरज नरवडे, दिनकर तोगे, राजेंद्र चौगुले यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी पाठविले.