रानभाज्या महोत्सवाचा सोपस्कार पार पाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:33 IST2021-08-15T04:33:05+5:302021-08-15T04:33:05+5:30

कळंब : काळाच्या ओघात दुर्मीळ होत चाललेल्या रानभाज्यांची नव्या पिढीला ओळख व्हावी, हा रानमेवा जपला जावा, यासाठी कृषी कार्यालयाने ...

Soapskar of Ranbhajya Mahotsav was carried out | रानभाज्या महोत्सवाचा सोपस्कार पार पाडला

रानभाज्या महोत्सवाचा सोपस्कार पार पाडला

कळंब : काळाच्या ओघात दुर्मीळ होत चाललेल्या रानभाज्यांची नव्या पिढीला ओळख व्हावी, हा रानमेवा जपला जावा, यासाठी कृषी कार्यालयाने गुरुवारी रानभाज्या महोत्सव आयोजित केला होता, परंतु कळंबमध्ये यात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची नगण्य संख्या पाहता, हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम एक ‘सोपस्कार’ म्हणूनच पार पाडल्याचे दिसून आले.

शेतशिवारात, बांधाकुदावर पावसाळ्यात विविध रानभाज्या उगवतात. कोणतेही बीजारोपण न करता, निसर्गतः उगविणाऱ्या या रानभाज्या खऱ्या अर्थाने रानमेवाच असतात. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्त्व असतात. त्या विविध रोगांवर, व्याधींवर औषधी म्हणून गुणकारी असतात. अशा या रानभाज्या शेतीच्या बदलत्या प्रवाहात नामशेष होत चालल्या आहेत. याची उगवण दुर्मीळ होत चालली आहे. यामुळे नव्या पिढीला याची चव तर दूरच, साधी नावेही ठाऊक नसतात. यामुळेच कृषी विभागाने हा निसर्गाचा अनमोल ठेवा जपला जावा, त्याचा प्रसार व्हावा, त्याची ओळख व जपणूक व्हावी, यासाठी ‘रानभाज्या महोत्सव’ आयोजित करावा, अशा सूचना दिल्या होत्या.

कळंब तालुका कृषी कार्यालयाने मात्र गुरुवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात या महोत्सवाला एक सोपस्कार म्हणून पार पाडल्याचे दिसून आले. हा महोत्सव आहे याचीच बहुतांश नागरिकांना, शेतकऱ्यांना माहिती नसल्याचे समोर आले आहे. यामुळे शासनाच्या एका चांगल्या हेतूने आयोजित केलेल्या उपक्रमाचे आयोजन ढिसाळ झाल्याचे दिसून आले आहे.

चौकट...

मोजक्याच भाज्या अन् मोजकीच उपस्थिती

गुरुवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात तालुका कृषी कार्यालयाने रानभाज्या महोत्सव आयोजित केला होता. हा महोत्सव होता की, एक लघुत्सोव याचा ताळमेळ लागत नव्हता. मोजक्या टेबलावर सहा, सात रानभाज्या मांडल्या होत्या. त्याची ओळख दर्शविणाऱ्या नावाचे खपटाचे फलक होते. या सोहळ्यात मोजकेच शेतकरी भाज्या घेऊन आले होते. पाहण्यासाठी आलेले शेतकरी किती होते, हा तर मोठा संशोधनाचा विषय होता. बाकी कृषी कर्मचारीच अधिकांश होते. यामुळे एका चांगल्या उपक्रमाचा गावपातळीवर प्रचार व प्रसिद्धी न केल्यामुळे ‘सोपस्कार’ पार पाडण्याचे काम कृषी कार्यालयाने केल्याचे दिसून आले.

Web Title: Soapskar of Ranbhajya Mahotsav was carried out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.