धक्कादायक! खर्चासाठी पैसे न दिल्याने अल्पवयीन मुलाने आईला जाळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 00:55 IST2020-04-17T00:55:00+5:302020-04-17T00:55:15+5:30
उस्मानाबाद जिल्ह्यात गुन्हा दाखल

धक्कादायक! खर्चासाठी पैसे न दिल्याने अल्पवयीन मुलाने आईला जाळले
तेर (जि़ उस्मानाबाद) : उस्मानाबाद जवळील तेर येथील एका अल्पवयीन मुलाने खर्चासाठी आपल्या आईकडे पैसे मागितले़ मात्र, ते न मिळाल्याने त्याने आईलाच जाळल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली़ उपचार घेताना या महिलेचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाल्याने मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तेर येथील गणपती मंदिर परिसरात वास्तव्यास असलेल्या एका ४९ वर्षीय महिलेकडे त्यांच्या १७ वर्षीय मुलाने बुधवारी सकाळी खर्चासाठी पैैसे मागतिले होते़ मात्र, त्यांनी पैैसे देण्यास नकार दिल्याने हा मुलगा चिडला होता़ यानंतर ही महिला आपल्या घराच्या अंगणातील तुळशीची पूजा करीत असताना मुलाने आईच्या अंगावर पाठीमागून ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले़ क्षणातच आई आगीच्या लोळाने वेढलेली पाहून तिच्या मुलीने आरडाओरडा सुरू केला़ तेव्हा शेजाऱ्यांनी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली़ तेर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर महिलेस उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले होते़ मात्र, गंभीररित्या भाजल्याने उपचार सुरू असतानाच गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला़
आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याचे, मयत महिलेचे व फिर्यादी पित्याचेही नाव देता येणार नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले़