रोडवर 'जॅक' टाकून थांबवली गाडी; सोलापूरच्या डॉक्टर कुटुंबाला पिस्तुलाचा धाकावर लुटले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 12:32 IST2025-10-18T12:30:21+5:302025-10-18T12:32:00+5:30
येणेगूर शिवारात थरार, भर रस्त्यावर प्रवाशांना अडवून दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना

रोडवर 'जॅक' टाकून थांबवली गाडी; सोलापूरच्या डॉक्टर कुटुंबाला पिस्तुलाचा धाकावर लुटले!
धाराशिव: उमरगा तालुक्यातील येणेगूर शिवारात भर रस्त्यावर प्रवाशांना अडवून दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास सोलापूर येथील एका डॉक्टर कुटुंबाला पिस्तुलाचा धाक दाखवून अज्ञात सहा ते सात दरोडेखोरांनी सुमारे ८० हजार रूपये किमतीचा ऐवज लुटून पोबारा केला आहे.
साेलापूर येथील डॉ. अब्दुल गफुर रऊ जुनैदी (६७) हे आपल्या कुटुंबासह एमएच. ०४- एचएफ. १८७५ या क्रमांकाच्या कारमधून प्रवास करत होते. गुरूवारी मध्यरात्री तुगावपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर, येणेगूर शिवारातील एका वळणावर त्यांची कार रोडवर आडव्या ठेवलेल्या एका लोखंडी जॅकवर आदळली. कार थांबताच आणि फिर्यादी व त्यांचे नातेवाईक वाहनामधून खाली उतरताच, अंधारातून आलेल्या अज्ञात सहा ते सात व्यक्तींनी त्यांना घेरले. या दरोडेखोरांनी फिर्यादींना आणि त्यांच्या कुटुंबाला काठी आणि पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत निर्माण केली.
धाकदडपशाहीत दरोडेखोरांनी फिर्यादींच्या जावई आणि भाची यांच्याकडील राेख २३ हजार रूपये आणि १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे ८० हजार रूपये किंमतीचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि अंधाराचा फायदा घेत तेथून पसार झाले. या घटनेने भयभीत झालेल्या डॉ. अब्दुल गफुर जुनैदी यांनी मुरुम पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून मुरुम पोलीस ठाण्यात अज्ञात सहा ते सात दरोडेखोरांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१०(२) आणि ३११ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.