सर आली धावून... यंदा श्रावणापूर्वीच ओसंडून वाहू लागला रामलिंगचा धबधबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 17:42 IST2022-07-17T17:41:44+5:302022-07-17T17:42:40+5:30
रामायण काळात प्रभू राम हे लक्ष्मणासह माता सितेच्या शोधत आले असताना श्रीरामांनी या ठिकाणी तीन दिवस मुक्काम करून शिवलिंगाची स्थापना केल्याची अख्यायिका सांगितली जाते

सर आली धावून... यंदा श्रावणापूर्वीच ओसंडून वाहू लागला रामलिंगचा धबधबा
उस्मानाबाद - जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिध्द असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील निसर्गरम्य ठिकाण म्हणजे येडशीतील रामलिंग हे पर्यटनस्थळ. स्वतः प्रभू रामचंद्रांनी स्थापन केलेले शिवलिंग म्हणजे रामलिंग महादेव मंदीर. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांचं आकर्षण असलेलं हे ठिकाण दरवर्षी श्रावण महिन्यात गर्दीने फुलून जाते. गेल्या 2 वर्षांपासून कोविडमुळे पर्यटकांना येथे फिरण्याची संधी मिळाली नाही. मात्र, यंदा पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यंदाच्या पावसाळ्यात श्रावणापूर्वीच येथील धबधबा वाहून जात आहे.
रामायण काळात प्रभू राम हे लक्ष्मणासह माता सितेच्या शोधत आले असताना श्रीरामांनी या ठिकाणी तीन दिवस मुक्काम करून शिवलिंगाची स्थापना केल्याची अख्यायिका सांगितली जाते. विशेष म्हणजे प्रभू श्रीरामाला मदत करणारे जटायु पक्षी रावणासोबत युध्द करून जखमी झालेले व जखमी अवस्थेत श्री रामाची वाट पहात असलेले हेच ते ठिकाण आहे. प्रभू श्रीरामाने जटायुच्या अंतिम क्षणी पाणी पाजण्यासाठी बाण मारुन पाणी काढले आणि तो मारलेला बाण हा आत्ताचा धबधबा असल्याची पुराणकथा येथे सांगितली जाते. रामकुंड धबधबा म्हणून येथील धबधबा प्रसिद्ध आहे.
यंदा श्रावणापूर्वी सततच्या पाऊसाने प्रवाहित झाल्याने कोरोना निर्बंधामुळे दोन वर्षे निसर्गाचा आनंदात न घेऊ शकले भाविक पर्यटक येथे सुट्टीच्या दिवशी गर्दी करत आहेत. तर, श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. रामलिंगचा हा निसर्गरम्य परिसर पर्यटकांच्या गर्दीने यंदाही फुलला असून अनेकजण सहकुटुंब सहपरिवार निसर्गाच्या सानिध्यात येथे येत आहेत. दरम्यान, बार्शी लाईट रेल्वेनेही येथे येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय होती. बार्शी रेल्वेच्या आठवणी आणि रामलिंगच्या पर्यटनाचे अनेक किस्से या भागात प्रसिद्ध आहेत.