संस्थाचालकांच्या छळाचा पाढा; मृत्यूपूर्वी मुख्याध्यापकांनी लिहीलं काळजाचा थरकाप उडवणारं सत्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 13:42 IST2026-02-17T13:41:03+5:302026-02-17T13:42:36+5:30
मुख्याध्यापक जाधवांच्या आत्महत्येने उमरगा सुन्न; कुटुंबाचा आधार कोसळला.

संस्थाचालकांच्या छळाचा पाढा; मृत्यूपूर्वी मुख्याध्यापकांनी लिहीलं काळजाचा थरकाप उडवणारं सत्य!
धाराशिव : हिप्परगा राव येथील एका खासगी शाळेवरील प्रभारी मुख्याध्यापकांनी संस्थाचालक व सहकारी शिक्षकांवर छळाचा आरोप करणारी चिठ्ठी लिहून सोमवारी उमरगा येथे राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत उमरगा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.
उमरगा तालुक्यातील हिप्परगा राव येथील एका खासगी शाळेवर टी. व्ही. जाधव हे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम पाहत होते. त्यांनी रविवारी रात्री उमरगा येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर उमरगा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचानामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. तपासणीनंतर सोमवारी सायंकाळी मयत जाधव यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी उमरगा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. मृत्यूनंतर जाधव यांची एक सुसाइड नोट समोर आली असून, त्यात संस्थाचालक व सहकारी शिक्षकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मात्र, याविषयी कोणतीही तक्रार अद्याप प्राप्त झाली नसल्याचे उमरगा ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी सांगितले.
चिठ्ठीत १० लाख मागितल्याचा आरोप
टी.व्ही. जाधव यांच्या पूर्वीचे मुख्याध्यापक निवृत्त झाल्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार जाधव यांना मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती देण्यासाठी संस्थेच्या संचालकांनी १० लाख रुपये मागितल्याचा दावा सुसाइड नोटमध्ये केला आहे. मात्र, ही रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर सहकारी शिक्षकांच्या माध्यमातून छळ सुरू करण्यात आल्याचा दावाही टी. व्ही. जाधव यांनी चिठ्ठीतून केला आहे. मात्र, या चिठ्ठीतील हस्ताक्षर जाधव यांचेच आहे किंवा नाही, याबाबत कोणतीही सत्यता स्पष्ट होऊ शकली नाही.