निकृष्ट कामाचा फटका! भूममध्ये पाझर तलाव फुटल्याने 150 एकर शेती उद्ध्वस्त!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 20:32 IST2025-09-18T20:31:53+5:302025-09-18T20:32:42+5:30
स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण, प्रशासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी

निकृष्ट कामाचा फटका! भूममध्ये पाझर तलाव फुटल्याने 150 एकर शेती उद्ध्वस्त!
- संतोष वीर
भूम (धाराशिव): भूम शहरातील साबळेवाडी येथे 14 वर्षांपूर्वी बांधलेला एक पाझर तलाव आज दुपारी अचानक फुटला. या दुर्घटनेमुळे सुमारे 150 एकर शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहाचे योग्य नियोजन न झाल्याने ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी 3 वाजता हा पाझर तलाव अचानक फुटला. जोरदार पावसामुळे तलावात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले होते, मात्र योग्य सांडवा नसल्याने पाण्याचा दाब वाढला आणि तलावाचा बंधारा फुटला. यामुळे तलावातील दगड आणि गाळ मोठ्या वेगाने शेतात पसरला, ज्यामुळे उभी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.
नदीकाठी घबराट आणि प्रशासनाची धावपळ
तलावाचे पाणी शहरातील लेंडी नदीपात्रात अचानक मोठ्या प्रवाहाने येऊ लागल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. नदीचा प्रवाह काही मिनिटांतच वाढल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले, पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना तलावापर्यंत पोहोचता आले नाही.
सध्या नदीचा प्रवाह नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तलाव फुटण्याची कारणे शोधण्यासाठी चौकशी सुरू असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली
या घटनेने बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी तातडीने मदतीची मागणी केली आहे. साबळेवाडी येथील शेतकरी रणजीत साबळे यांनी सांगितले की, "तलावाच्या निकृष्ट कामामुळे आज आमच्या 150 एकर जमिनीचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करावी." या दुर्घटनेमुळे इतरही पाझर तलावांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.