२२ महिलांच्या मदतीने २ कोटी लुटणाऱ्या शिपायाला अटक; नागपूरच्या वस्तीत दीड महिना बसला होता लपून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 18:14 IST2025-10-15T18:13:27+5:302025-10-15T18:14:04+5:30
धाराशिवच्या सहकारी संस्थेतून कोट्यवधींची चोरी करुन पळालेल्या शिपायाला पोलिसांनी अटक केली

२२ महिलांच्या मदतीने २ कोटी लुटणाऱ्या शिपायाला अटक; नागपूरच्या वस्तीत दीड महिना बसला होता लपून
Dharashiv Crime:धाराशिवच्या लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या तुळजापूर शाखेतील २.१ कोटी रुपयांच्या चोरीचाधाराशिवपोलिसांच्या क्राइम ब्रांचने पर्दाफाश केला आहे. ३ ऑगस्ट रोजी झालेल्या या चोरीप्रकरणी सोसायटीच्या एका शिपायाला नागपूरमधून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी तब्बल २२ वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची मदत घेतली.
आरोपी दत्ता कांबळे (वय २८) हा तुळजापूर शाखेत कंत्राटी कर्मचारी (शिपाई) म्हणून काम करत होता. तो पदवीधर असून, गेल्या तीन वर्षांपासून सहकारी संस्थेत काम करत होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केल्यामुळे त्याला लॉकरपर्यंत जाण्याची आणि रोख रक्कम व दागिन्यांचे व्यवस्थापन करण्याची परवानगी मिळाली होती. ३ ऑगस्ट रोजी त्याने संस्थेतून सुमारे ३४.६ लाख रुपये रोख आणि गहाण ठेवलेले २.७ किलो सोन्याचे दागिने चोरून पळ काढला होता. यामध्ये सामान्य शेतकऱ्यांचे दागिने होते. प्रकरणाचे गांभीर्य पाहून धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे शाखाआणि आर्थिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले.
फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदा त्याच्या मनात चोरीचा विचार आला होता. सहा महिने प्लॅनिंग करत मोठ्या प्रमाणात ऐवज जमण्याची तो वाट पाहत होता. ऑगस्टमध्ये रोकड व सोने भरपूर जमा झाल्यानंतर त्याने ३ ऑगस्ट रोजी हा ऐवज घेऊन पळ काढला. चोरी केल्याच्या दिवसापासून त्याने त्याचा मोबाइल वापरणे बंद केले. यामुळे पोलिसांना त्याचा माग काढणे कठीण जात होते. बँकेतील सीसीटीव्हीपासून वाचून त्याने ही चोरी केली होती. बँकेत सापडलेल्या एका आधार कार्डाच्या मदतीने त्याने रेल्वे व इतर प्रवासाचे बुकिंग केले होते.
आरोपीने दत्ताचे कुठेच नाव येत नसल्याने त्याने अत्यंत काळजीपूर्वक पळून जाण्याची योजना आखली होती. तांत्रिक तपासामध्ये तो अनेक शहरांमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना भेटायला जात असल्याची माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी एक योजना आखली. पोलिसांनी आरोपी संपर्कात असलेल्या २२ वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांशी संपर्क साधला आणि त्यांना पोलिसांना मदत करण्याची विनंती केली. यापैकी एका महिलेने आरोपी तिच्याकडे आल्यावर, पोलिसांना गुप्तपणे माहिती दिली. पोलीस तातडीने नागपूर शहरातील इमामवाडा परिसरातील झोपडपट्टी भागात पोहोचले आणि त्यांनी दत्ता कांबळेला अटक केली. नजर चुकवण्यासाठी आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी तो याच भागात लपून राहत होता.
चोरलेले सोने हे बहुतांश शेतकऱ्याचे होते, ज्यांनी लहान कर्जासाठी आपले दागिने गहाण ठेवले होते. त्यामुळे गुन्ह्याचा छडा लावणे आणि मौल्यवान वस्तू परत मिळवणे, ही पोलिसांची प्राथमिकता होती. पोलिसांनी कांबळेकडून चोरीची कबुली घेतली असून, त्याच्याकडून ११ लाख रुपये रोख आणि २.१ किलो सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.