पारगाव - येथील पशुवैद्यकीय दवाखान्याने ‘सुंदर माझे कार्यालय’ या उपक्रमामध्ये वाशी तालुक्यातून अव्वल स्थान पटकाविले आहे. १७ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन डाॅ. डी. टी. बाबर यांचा गाैरव करण्यात आला.
औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून २०२०-२०२१ मध्ये सुंदर माझे कार्यालय हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात विभाग ते गावस्तरावरील प्रत्येक कार्यालयाला सहभागी होण्याबाबत आदेशित केलेले होते. यामध्ये प्रत्येक कामाला गुण ठरवून दिलेले होते. यात ज्या कार्यालयाचे गुण जास्त होतील ते पुरस्कारासाठी पात्र ठरणार होते. त्यानुसार सर्व कार्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले असता, वाशी तालुक्यातून पारगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना अव्वल ठरला आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. यतीन पुजारी यांच्या हस्ते डाॅ. डी. टी. बाबर यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गाैरविण्यात आले. याबबत डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.