खरीप पिकांच्या पंचनाम्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:38 IST2021-08-14T04:38:23+5:302021-08-14T04:38:23+5:30

उस्मानाबाद : हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळण्याच्या ...

Order of Panchnama of Kharif crops | खरीप पिकांच्या पंचनाम्याचे आदेश

खरीप पिकांच्या पंचनाम्याचे आदेश

उस्मानाबाद : हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळण्याच्या अनुषंगाने पंचनामे करून अनुदान व विमा नुकसानभरपाई देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकतीच करण्यात आली होती तसेच राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याशीही चर्चा करण्यात आली. त्यानंतर खरीप पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश आयुक्तांनी महसूल व कृषी यंत्रणांना दिल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ५७.२ टक्केच पाऊस झाला आहे. अनेक मंडळामध्ये २२ दिवसांचा खंड पडला आहे. वीज भारनियमन व इतर कारणांमुळे पिकांना सरसकट पाणी देणेही शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये मोठी घट होत असल्याचे दिसून आले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील तरतुदीनुसार शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये उंबरठा उत्पन्नाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर हवामानातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसानभरपाई निश्चित करून त्या नुकसानभरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. झालेल्या नुकसानीबाबत योजनेतील तरतुदीप्रमाणे शेतकऱ्यांना आगावू रक्कम मिळण्याकरिता विमा कंपनी अधिकाऱ्यांसह कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संयुक्त पंचनामे करून नुकसानीचे प्रमाण व नुकसानभरपाईची रक्कम ठरविणे अपेक्षित आहे. या अनुषंगाने आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी लागलीच कृषी व महसूल विभागाला पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विहीत कार्यप्रणालीचा भाग म्हणून सुरुवातीला तातडीने नमुना चाचणी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

केंद्र / राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून पैसेवारीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये नजर अंदाज पैसेवारी काढण्यात येते व डिसेंबरअखेर अंतिम पैसेवारी निष्पन्न झाल्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या आपत्ती प्रतिसाद निधीमधून अनुदान दिले जाते. यासाठीही आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार पाटील म्हणाले.

Web Title: Order of Panchnama of Kharif crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.