कांद्यात अफूची 'शेती'! धाराशिव गुन्हे शाखेने जप्त केली ७३ लाखांची बोंडे, आरोपी फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 14:27 IST2026-02-12T14:26:56+5:302026-02-12T14:27:21+5:30
पोलिसांनी आपल्या शेतात कारवाई केल्याचे कळताच आरोपी गावातून पसार झाला.

कांद्यात अफूची 'शेती'! धाराशिव गुन्हे शाखेने जप्त केली ७३ लाखांची बोंडे, आरोपी फरार
वाशी/धाराशिव : कमी वेळेत अनधिकृत मार्गाने झटपट पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी कांद्यासोबत अफूची लागवड करणे एकास महागात पडले. खबऱ्याने दिलेल्या माहितीवरुन धाराशिवच्या गुन्हे शाखेने दसमेगाव शिवारात कारवाई करीत तब्बल ७३ लाख रुपये किंमतीची अफूची बोंडे जप्त केली आहेत. याबाबत बुधवारी रात्री आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गुरुवारी पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी दिली.
वाशी तालुक्यातील दसमेगाव शिवारात येथील आरोपी समाधान मनोहर उघडे याने कांदा पिकासोबतच अफूची आंतरपीक पद्धतीने लागवड केली होती. तब्बल १ एकर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात ही अफू जोमाने वाढली. कांद्यापेक्षा उंच वाढ झाल्यानंतर त्यास पिवळी, गुलाबी, पांढरी फुले व बोंडे लागल्याचे स्पष्टपणे दिसत होती. हे पीक संशयास्पद वाटल्याने एका खबऱ्याने पोलिस अधीक्षकांकडे माहिती कळवली. त्यांनी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना कारवाईची सूचना केल्यानंतर त्यांनी प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी मेघना आय.एन. यांच्यासह सहायक निरीक्षक सुदर्शन कासार, शौकत पठाण, जावेद काझी, दत्तात्रय राठोड, दयानंद गादेकर, अशोक ढगारे, सुभाष चौरे, नागनाथ गुरव, वाशीचे सहायक निरीक्षक यशवंत घोडके व त्यांच्या टीमसह उघडे यांच्या शेतात कारवाई केली. कांद्यात दिसून येणारे आंतरपीक हे अफू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महसूलचे अधिकारी व पंचासमक्ष पंचनामा करुन हे पीक उपटण्यात आले. त्याची फुले व बोंडांचे वजन ४८५ किलोग्रॅम इतके भरले. बाजारभावानुसार या जप्त अफूची किंमत तब्बल ७२ लाख ८४ हजार ७५० रुपये इतकी असल्याची माहितीही पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी दिली.
कारवाई कळताच आरोपी रफूचक्कर...
पोलिसांनी आपल्या शेतात अवैधरित्या लागवड केलेल्या अफूवर कारवाई केल्याचे कळताच आरोपी समाधान उघडे गावातून पसार झाला. पोलिसांची पथके त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी त्याच्यावर वाशी ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क) व १८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.